देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाबाधितांच्या रुग्णांत वाढ होऊ नये म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर आता भारतीय सेनेने सुद्धा कोरोनाशी लढा देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी या महारोगाला पळवून लावण्यासाठी ऑपरेशन नमस्ते ची घोषणा केली आहे. सेनेचे चीफ एमएम नरवणे यांनी स्वत: याची घोषणा करत माहिती दिली आहे. देशात कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी सेनेकडून एकूण आठ क्वारंटाइन केंद्र उभारण्यात आली आहेत.
ऑपरेशन नमस्ते जाहीर करत एमएम नरवणे यांनी असे म्हटले आहे की, कोरोना सारख्या महाभयंकर संकटात सरकारची मदत करणे हे सेनेचे कर्तव्य आहे. सेनेकडून आतापर्यंत सर्व अभियाने पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडली आहेत. त्यामुळे आता ऑपरेशन नमस्ते सुद्धा यशस्वी जरुर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच सेनाप्रमुख म्हणून अन्य जवानांना सुरक्षित आणि फिट ठेवणे ही माझी प्राथिमक जबाबदारी आहे. तसेच आम्ही आमचे कर्तव्य तेव्हाच पूर्ण करु ज्यावेळी आमचे जवान सुरक्षित राहतील.(Coronavirus In India: भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 724, महाराष्ट्रातील विदर्भात 5 नवे रूग्ण)
Indian Army has code-named its anti #COVID19 operations as Operation Namaste. Army has, so far, established eight quarantine facilities across the country. pic.twitter.com/bmQh1Zr4Ua
— ANI (@ANI) March 27, 2020
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेला आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू आणि 66 जणांच्या प्रकृतीत सुधारणा आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गुजरात येथे 3 जण, कर्नाटक येथे 2 जण, मध्य प्रदेश, तमिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू कश्मीर आणि हिमाचल येथे प्रत्येकी 1-1 जणांचा मृत्यू झाला आहे.