आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. देशात महिला आणि पुरुषांसाठी समान संधी उपलब्ध होत आहेत. महिला आज कोणत्याही अर्थाने पुरुषांपेक्षा कमी नाहीत आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरप्रीत सिंह (Harpreet A De Singh). हरप्रीतने भारतीय विमान उद्योगात इतिहास रचला आहे. हरप्रीतसिंह यांना एअर इंडियाची सहायक कंपनी अलायंस एअरच्या (Alliance Air) सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एखादी महिला एअरलाईन्सची सीईओ म्हणून नेमण्यात येण्याची भारतामधील ही पहिलीच घटना आहे. हरप्रीत सध्या एअर इंडियाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (फ्लाइट सेफ्टी) आहेत.
हरप्रीत सिंह यांची 1988 मध्ये एअर इंडियाची पहिली महिला पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जास्त काळ विमान उड्डाण करता आले नसले तरी, फ्लाईट सेफ्टी क्षेत्रात त्यांनी काम सुरू ठेवले. आता 32 वर्षानंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे आणि त्यांना भारतीय एअरलाइन्सच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नेमण्यात आले. आता एअर इंडियामध्ये सध्या वरिष्ठ कमांडर म्हणून असलेल्या कॅप्टन निवेदिता भसीन यांची फ्लाइट सेफ्टीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा: विमान प्रवासापेक्षा किराणा दुकानात जाणे, रेस्टॉरंटमध्ये खाणे धोकादायक; हार्वर्ड संशोधकांच्या अभ्यासातून खुलासा)
एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल म्हणाले की, हरप्रीतसिंह पुढील आदेश होईपर्यंत अलायन्स एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कर्णधार निवेदिता भसीन यांनाही इतर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या एअर इंडियाची विक्री होणार आहे पण अलायन्स एअर या कराराचा भाग होणार नाही. अलायन्स एअर ही सरकारी कंपनीच राहील. जर कंपनीला एखादा खरेदीदार सापडला आणि त्याचे खाजगीकरण झाले तर, एअर इंडियाचे जुने बोइंग 747 ला अलायन्स एअरमध्ये हस्तांतरित केले जाईल.