Coronavirus: विमान प्रवासापेक्षा किराणा दुकानात जाणे, रेस्टॉरंटमध्ये खाणे धोकादायक; हार्वर्ड संशोधकांच्या अभ्यासातून खुलासा
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात बंद असलेल्या गोष्टी आता जवळजवळ प्रत्येक राज्यात सुरु झाल्या आहेत. या काळात आपण भेट देत असलेल्या जागांमध्ये, किराणा (Grocery) दुकान हे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाची गोष्ट आहे. यासह आता लोक रेस्टॉरंटमध्ये (Restaurants) खायला जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी जाताना आपण जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. एका अभ्यासानुसार हे दिसून आले आहे की, विमान प्रवासापेक्षा (Air Travel) किराणा दुकान व रेस्टॉरंट ही दोन्ही ठिकाणी जास्त धोकादायक आहेत. हा अभ्यास हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (Harvard T H Chan School of Public Health) शास्त्रज्ञांनी केला आहे.

या आठवड्यात 'एव्हिएशन पब्लिक हेल्थ इनिशिएटिव्ह' या शीर्षकाच्या प्रकाशित लेखातून हे उघड झाले आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, जर विमान प्रवास करणारे लोक कोरोना विषाणूंविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करत प्रवास करत असतील, तर या विषाणूचा प्रसार झपाट्याने कमी होऊ शकतो. विमानतळांवर प्रवाशांना नियमितपणे आपले हात धुवावे लागतात, मास्क घालावे लागतो आणि अधिकाऱ्यांना विमानतळावर, विमानात स्वच्छता ठेवण्याच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले आहे. अभ्यासानुसार, जर या नियमांचे काळजीपूर्वक पालन केले गेले तर, किराणा दुकानांना भेट देणे किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण खाणे अशा गोष्टींपेक्षा हवाई प्रवास हा सुरक्षित आहे. (हेही वाचा: मॉडर्ना कंपनीच्या कोविड-19 लसीचे सकारात्मक परिणाम; प्रायोगिक तत्त्वावर लस लॉन्च करण्यासाठी सज्ज)

अभ्यासामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, व्हायरसला पराभूत करण्यासाठी शिक्षण आणि जागरूकता सर्वात महत्वाची आहे. एअरलाइन्स आणि विमानतळे देखील व्हायरसचे संक्रमण कमी करण्यासाठी, प्रवाश्यांना सूचित करण्यासाठी मोहीम राबवित आहेत. यात विमानात चेक इन, बोर्डिंग आणि बुकिंगच्या वेळी सार्वजनिक आरोग्य सुरक्षा माहितीचा समावेश आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केबिन क्रूला देखील विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. हा अभ्यास जागतिक स्तरावर कोरोनाच्या 45 दशलक्षाहूनही अधिक घटनांद्वारे केला गेला आहे.