Independence Day 2020: 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकवल्यास Sikhs For Justice कडून सव्वा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; IB च्या इशाऱ्यानंतर सुरक्षा वाढवली
The suspected terrorists were apprehended near the Red Fort | File image | (Photo Credits: PTI)

यंदाचा स्वातंत्र्य दिन (Independence day 2020) हा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे विशेष सावधगिरीने साजरा केला जाईल. लाल किल्ल्या (Red Fort) वरील कार्यक्रमात केवळ मर्यादित लोकांना आमंत्रित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यासह देशाला संबोधित करतील, याकडे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज (Khalistan Flag) फडकविण्याची धमकी एका दहशतवादी संघटनेने दिली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दक्षता वाढविली आहे व लाल किल्ल्यावर सुमारे 4,000 सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहेत.

यंदाच्या स्वातंत्र्यदिना वेळी इंटेलिजन्स एजन्सीने (IB) मोठा इशारा दिला आहे. आयबीने म्हटले आहे की, खलिस्तान ध्वजाची मागणी करणाऱ्या शीख फॉर जस्टिसच्या (Sikhs For Justice) नेतृत्वात असलेल्या एका मास्टरने सांगितले आहे की, लाल किल्ल्यावर 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी जो कोणी खलिस्तान ध्वज फडकवले त्याला सव्वा लाख डॉलर्सचे बक्षीस देण्यात येईल.

यासाठी शीख फॉर जस्टिसने एक व्हिडिओही जारी केला आहे. व्हिडिओमध्ये लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकवण्याची घोषणा करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये, शीख फॉर जस्टिसचे अधिकारी म्हणत आहेत की, जो कोणी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवेल 1.25 दशलक्ष डॉलर्स दिले जातील. आयबी कडून असा इशारा मिळाल्यानंतर लाल किल्ला आणि त्याच्या आसपासची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवती भारतीय सैन्य आणि पोलिस तैनात आहेत. (हेही वाचा: 'Sikhs for Justice' या खलिस्तान समर्थक संघटनेवर सरकारची मोठी कारवाई; 40 वेबसाइट्सवर घातली बंदी)

दरम्यान, याआधी हरियाणा पोलिसांनी या खलिस्तान समर्थक संघटनेचे स्वयंभू प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannu) विरोधात देशद्रोह आणि फुटीरतावाद या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सरकारने 10 जुलै 2019 रोजी या संघटनेवर बंदी घातली होती. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील तरतुदींनुसार केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलेल्या नऊ जणांमध्ये पन्नू याचा समावेश आहे. खलिस्तान समर्थकांना पाकिस्तानी आयएसआय कडून बरीच मदत केली जाते.