
आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी 2022 आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये (IIFL Wealth Hurun India Rich List 2022) अव्वल स्थान पटकावले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत एका वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत दररोज 1612 कोटी रुपयांची वाढ होत गेली आहे. संपत्तीमध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक बेझोस यांना मागे टाकले आहे. सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी त्यांच्या मालमत्तेत 5,88,500 कोटी रुपयांची भर घातली आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सध्या 10,94,400 कोटी रुपये आहे.
गेल्या पाच वर्षात विविध कंपन्यांचे संपादन आणि नवीन व्यवसायाची सुरुवात केल्याने, गौतम अदानी यांच्या मालमत्तेत फार मोठी वाढ झाली आहे. या काळात त्यांची संपत्ती 1440 टक्क्यांनी वाढली आहे. अदानी समूहाच्या सातही सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समधील वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये जबरदस्त झेप घेतली आहे. अनस रहमान जुनैद, एमडी आणि मुख्य संशोधक, हुरुन इंडिया यांच्या मते, 2022 हे वर्ष एका भारतीयाच्या संपत्तीच्या संदर्भात अदानी समूहाच्या या नेत्रदीपक वाढीसाठी लक्षात राहील.
ते पुढे म्हणाले, गौतम अदानी हे एकमेव भारतीय आहेत ज्यांच्या सातही कंपन्यांचे मार्केट कॅप एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने अलीकडेच अंबुजा सिमेंट आणि एसीसी विकत घेऊन सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि देशातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक समूह बनला आहे. (हेही वाचा: मुंबईमधील नवरात्री आणि दुर्गापूजा मंडळांसाठी खुशखबर; Adani Electricity ने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर)
दुसरीकडे, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका वर्षात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे, मात्र अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्यामुळे, अंबानी 10 वर्षात प्रथमच दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियानुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 7.94 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 115 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस पूनावाला यांनी गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 41,700 कोटी रुपयांनी वाढवली आहे आणि ते या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. पूनावाला यांची कंपनी जगातील सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी आहे. यानंतर शिव नाडर, राधाकृष्ण दमानी आणि विनोद शांतीलाल अदानी या यादीत चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.