कोरोना विषाणूच्या 2 वर्षांच्या सावटानंतर यंदा सर्व सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होत आहेत. सध्या देशभरात नवरात्रीची (Navratri) धूम पहायला मिळत आहे. अशात मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. विशेषत: अदानी इलेक्ट्रिसिटीचे ग्राहक यावर्षी वीज बिलांची चिंता न करता आगामी नवरात्री/दुर्गापूजा साजरी करू शकतात. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईतील नवरात्री/दुर्गापूजा मंडळांना कमी दारात वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन कंपनीने मंडळांना केले आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीने अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 दिवसांच्या आत मंडळांना तात्पुरती जोडणी देऊ केली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे दर 7 रुपये प्रति युनिट असतील. गणेशोत्सवादरम्यान कंपनीने 850 मंडळांना किफायतशीर दराने वीज पुरवठा केल्याचे सांगितले. नवरात्री/दुर्गापूजेदरम्यान मंडळांच्या अर्जासाठी कंपनी व्यावसायिक किंवा औद्योगिक दर आकारणार नाही.
गणपती उत्सवाप्रमाणे आगामी नवरात्री/दुर्गापूजादेखील कोणत्याही कोविड-19 निर्बंधांशिवाय साजरी केली जाईल, असे शिंदे-फडणवीस सरकारने आधीच सांगितले असल्याने, कंपनीची ही घोषणा महत्त्वाची आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 दिवसांच्या आत सर्व नवरात्री/दुर्गापूजा मंडळांना वीज जोडणी मिळण्याची खात्री करण्यासाठी आम्ही विस्तृत व्यवस्था केली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही मंडळांना केवळ अधिकृत कनेक्शन घेण्याचे आवाहन करतो. आमच्या www.adanielectricity.com या वेबसाइटला भेट देऊन तसेच मुंबईच्या उपनगरात पसरलेल्या AEML विभागीय ग्राहक सेवा केंद्रांना भेट देऊन ते कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामुळे आमच्या ग्राहकांना सणाच्या काळात अखंड वीजपुरवठा प्राप्त होईल. (हेही वाचा: Gautam Adani यांनी घेतली Uddhav Thackeray यांची भेट, 'या' मुद्द्यांवर चर्चा)
सणासुदीच्या काळात कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यावर भाष्य करताना प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही सर्व नवरात्री/दुर्गापूजा मंडळांना आवाहन करतो की, त्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडूनच वायरिंग करून घ्यावे आणि मंडळांना भेट देणारे भक्त आणि स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर (Earth Leakage Circuit Breaker) बसवावे.’