
सध्याचे युग डिजिटल आहे आणि बहुतेक काम ऑनलाइन होते. मात्र अजूनही दररोज लाखो लोक रेल्वे काउंटरवरून ट्रेन तिकिटे खरेदी करतात. जर तुम्ही कधी रेल्वे काउंटरवरून तिकीट काढले असेल, तर एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, ते ऑनलाइन रद्द करता येते का? अनेक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना काउंटरवर काढलेले तिकीट रद्द करण्यासाठी स्टेशनवरच जावे लागेल, परंतु आता तसे नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकिटांसाठी ऑनलाइन रद्दीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेली तिकिटे ऑनलाइन देखील रद्द करता येतात. याचा अर्थ असा की आता तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करण्यासाठी स्टेशनवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. मात्र, रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा मिळविण्यासाठी प्रवाशांना नजीकच्या आरक्षण केंद्रावर भेट देणे आवश्यक आहे.
ऑनलाइन रद्दीकरण प्रक्रिया:
आयआरकीटीकीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि 'ट्रेन' विभागात 'तिकिट रद्द करा' हा पर्याय निवडा. त्यानंतर 'काउंटर तिकिट' हा पर्याय निवडा.
पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा कोड सारखी आवश्यक माहिती भरा. रद्दीकरणाच्या अटी समजल्याचे दर्शविण्यासाठी संबंधित बॉक्सवर क्लिक करा आणि 'सबमिट' करा.
बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) पाठविला जाईल.
प्राप्त ओटीपी प्रविष्ट करा आणि रद्दीकरणाची पुष्टी करा.
परतावा प्रक्रिया:
तिकिट रद्द केल्यानंतर, प्रवाशांना मूळ तिकिट घेऊन नजीकच्या आरक्षण केंद्रावर जावे लागेल. तेथे तिकिट सादर करून परतावा मिळेल. तिकीट रद्द करण्याचे शुल्क ट्रेन आणि वर्गानुसार बदलते. (हेही वाचा: Dearness Allowance Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्ता 2% नी वाढला; मंत्रिमंडळाची मंजूरी)
महत्वाची सुचना:
सामान्य परिस्थितीत, काउंटर तिकिटे आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे किंवा विहित वेळेच्या आत 139 क्रमांकावर कॉल करून ऑनलाइन रद्द करता येतात.पूर्णपणे निश्चित तिकिटांसाठी, ऑनलाइन रद्दीकरण ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 4 तास आधीपर्यंतच करता येते. आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील तिकिटांसाठी, ऑनलाइन रद्दीकरण ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 30 मिनिटे आधीपर्यंतच करता येते. ही नवीन सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरेल, ज्यामुळे तिकिट रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.