पबजी (PUBG) गेमच्या नादात अनेकांनी टोकाची पाऊल उचल्याच्या अनेक घटना यापूर्वी कानावर आल्या आहेत. पण आता एक अनोखी घटना समोर येत आहे. पबजी खेळता खेळता प्रेम जमलेली एक विवाहित महिला तरुणाला भेटण्यासाठी चक्क हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) वाराणसीला (Varanasi) आली. मात्र नंतरच स्वत:च घरी फोन करुन परत घेऊन जाण्याची विनंती केली. पोलिसांच्या मदतीने ती तिच्या घरी सुखरुप पोहचली आहे. न्यूज 18 ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात राहणारी एक विवाहित महिला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक बेपत्ता झाली. औषध आणायला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली महिला घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र तरीही ती न सापडल्याने त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला आणि तिला वाराणसीहून तिच्या घरी सुखरुप पोहचवले. (PUBG गेमच्या व्यसनातून 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; नाशिक येथील राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन)
मात्र घर सोडण्याचे कारण महिलेने सांगितलेले कारण चक्रावून टाकणारे आहे. पबजी खेळता खेळता ही महिला वाराणसी येथील एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीतून मैत्री झाली. दोघांचं मोबाईल बोलणं सुरु झालं. त्यानंतर दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. त्यानंतर काही दिवसांनी तिने त्याला भेटण्यासाठी वाराणसी गाठलं. मात्र तो तरुण 12 वीचा विद्यार्थी असल्याच तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने कुटुंबियांना फोन करुन घरी परत नेण्यासाठी विनंती केली. या महिलेचा पती खाजगी कंपनीत कामाला आहे.
यापूर्वी पबजी गेमच्या नादातून अनेकांच्या हातून हत्या, आत्महत्या यांसारखे गुन्हे घडले आहेत. परंतु, ही अनोखी घटना सर्वांनाच हैराण करणारी आहे.