पबजी गेम (PUBG Game) खेळण्याच्या व्यसनामुळे एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक येथून समोर येत आहे. स्वरुप (Swarup) असं या मुलाचं नाव असून तो नाशिक (Nashik) येथील भोई गल्लीत राहत होता. स्वरुपला पबजी खेळण्याचा नाद होता. मात्र सध्या भारतात पबजीला बंदी असल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. बुधवार, 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली.
9 डिसेंबर रोजी स्वरुप घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीत झोपायला गेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी तो खाली आला नाही. त्यामुळे त्याची आई त्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेली असता स्वरुपने गळफास घेतल्याचे आढळून आले.
मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहून आईने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी देखील घटनास्थळाची पाहाणी केली असून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
यापूर्वी गेम खेळायला मोबाईल न दिल्याने एका 19 वर्षीय युवकाने डोक्यात दगड घालून शेतकरी तरुणाची हत्या केल्याची घटना नाशिक येथूनच समोर आली होती. याला फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. मात्र स्वत:चा मोबाईल बिघडल्याने तो जिभाऊ या शेतकरी तरुणाकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागत होता. (नाशिक: गेम खेळायला मोबाईल न दिल्याच्या रागातून गावातील शेतकऱ्याची हत्या; 19 वर्षीय युवक अटकेत)
पबजी गेमच्या वेडापायी अनेकांनी हत्या, आत्महत्या यांसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. मोबाईलच्या व्यसनाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तसंच हाती असलेल्या सुविधांचा वापर कसा आणि कितपत करावा, याचेही संस्कार मुलांवर करणे, आवश्यक आहे.