नाशिक: गेम खेळायला मोबाईल न दिल्याच्या रागातून गावातील शेतकऱ्याची हत्या; 19 वर्षीय युवक अटकेत
Crime | (Photo Credits: PixaBay)

एका शुल्लक कारणावरुन गावातील शेतकऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक (Nashik) येथून समोर येत आहे. गेम खेळायला मोबाईल न दिल्याच्या रागातून एका 19 वर्षीय युवकाने डोक्यात दगड घालून शेतकरी तरुणाची हत्या केली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस तपासात या प्रकरणाचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी सुनिल शिवाजी मोरे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. (Raipur Murder: दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले; एकाने सिने स्टाईलने केली दुसऱ्याची हत्या)

नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील भौरी गावातील ही घटना असून दोन दिवसांपूर्वी जिभाऊ गायकवाड या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह शेताजवळ सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिस घटनास्थली दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. मात्र हत्या झालेल्या जिभाऊचा मोबाईल पोलिसांना सापडला नाही. अधिक तपासात मोबाईल गावातील एका व्यक्तीकडे असल्याचं समजलं आणि पोलिस सुनिल मोरे याच्यापर्यंत पोहचले. पोलिसांच्या चौकशीत गेम खेळण्यासाठी मोबाईल मिळावा यासाठी जिभाऊची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.

सुनिलला फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. मात्र त्याचा मोबाईल खराब झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून तो जिभाऊकडे मोबाईल मागत होता. मात्र जिभाऊ मोबाईल देण्यास नकार देत होता. त्यामुळे त्याचा मोबाईल मिळवण्यासाठी सुनिलने जिभाऊची डोक्यात दगड घालून हत्या केली. (Paithan Triple Murder: महाराष्ट्राला हादरवणारी घटना! औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या)

आजकाल लहान मुलांसह तरुणांना लागलेले मोबाईलच्या व्यसनातून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. हत्या, आत्महत्या यांसारख्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे यात अल्पवीयन आणि तरुण मुलांचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी पबजी या लोकप्रिय गेमच्या व्यसनातून अनेकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला होता. तर काहीजण मजल जवळच्या व्यक्तीचा खून करण्यापर्यंत देखील गेली होती. या सर्व घटना थांबवण्यासाठी मोबाईलच्या व्यसनाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तसंच हाती असलेल्या सुविधांचा वापर कसा आणि कितपत करावा, याचेही संस्कार मुलांवर करणे, ही काळाची गरज बनली आहे.