प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

हायरिंग प्लॅटफॉर्म हायरेक्टने (Hirect) केलेल्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, बेंगळुरू (Bangalore) हे 17.6 टक्क्यांच्या सरासरीसह सर्वाधिक नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अहवालानुसार, बेंगळुरूनंतर दिल्ली आणि मुंबई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हायरेक्टच्या अभ्यास अहवालात, राष्ट्रीय राजधानी दिल्लीने सरासरी 11.5 टक्क्यांसह दुसरे स्थान पटकावले आहे, तर मुंबई शहराने सरासरी 10.4 टक्क्यांसह तिसरे स्थान मिळवले आहे.

उत्तर प्रदेशातील हायटेक सिटी नोएडाला सरासरी अवघ्या सहा टक्क्यांसह या यादीत चौथे स्थान मिळाले आहे. हायरेक्टचा हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास अहवाल आहे. या अहवालात ‘न्यू नॉर्मल’नंतर येणार्‍या काळात जॉब मार्केट भारतात कसे बदल घडवून आणणार आहे आणि उमेदवार-प्रेरित (Candidate-Driven) मार्केटमध्ये सक्सेस सर्व्हायव्हलची शक्यता काय आहे याची माहिती दिली आहे. विक्री आणि व्यवसाय विकास क्षेत्रात सर्वाधिक 26.9 टक्के रोजगार निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यापाठोपाठ आयटी (IT) आणि आयटीईएस (ITeS) सेवा क्षेत्राचे सरासरी प्रमाण 20.6 टक्के आहे. खरेदी आणि विक्री क्षेत्र हे सरासरी 0.3 टक्क्यांसह वर्षातील सर्वात कमी रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत IT/ITES उद्योगात नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय कंपन्यांमधील जलद डिजिटलायझेशनच्या प्रभावामुळे देखील हे असू शकते. महत्वाचे म्हणजे भारतीय IT सॉफ्टवेअर क्षेत्रातील भर्ती क्रियाकलाप दरवर्षी 163 टक्क्यांनी वाढत आहेत. (हेही वाचा: ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध; 5 जून 2022 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन)

आयटी अभियंते 20 टक्के सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये टॉपवर आहेत. 5-10 वर्षांचा अनुभव असलेल्यांना सरासरी 54.2 टक्‍क्‍यांसह सर्वोच्च पगाराच्या नोकऱ्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर विक्री आणि व्यवसाय विकास क्षेत्राचा क्रमांक लागतो, जेथे 20.4 टक्क्यांपर्यंत पगारवाढ दिसून आली आहे.