Hath Se Hath Jodo Abhiyan: ‘भारत जोडो यात्रा’ नंतर कॉंग्रेस सुरु करणार ‘हाथ से हाथ जोडो अभियान’; जाणून घ्या काय असेल खास
Congress Flag (Photo Credit- PTI)

काँग्रेसने (Congress) रविवारी सांगितले की, 'भारत जोडो यात्रे'नंतर पक्ष 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान' (Hath Se Hath Jodo Abhiyan) सुरू करणार आहे. या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क केला जाईल. वेणुगोपाल यांनी सांगितले की, दोन महिन्यांच्या या मोहिमेत राहुल गांधींचे पत्र लोकांच्या हाती दिले जाईल, ज्यामध्ये यात्रेचा संदेश असेल आणि नरेंद्र मोदी सरकारविरोधातील आरोपपत्रही त्यासोबत जोडले जाईल.

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचेल आणि 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये संपेल. त्यानंतर ‘हात से हाथ जोडो’ मोहिमेअंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम होणार आहे. रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते 'हाथ से हाथ जोडो मोहिमे'शी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्याचबरोबर छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे.

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे अधिवेशन फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार असून त्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्थापन केलेल्या काँग्रेस सुकाणू समितीची पहिली बैठक रविवारी संपली.

या बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्य संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्याबरोबरच पूर्ण अधिवेशनाचा कार्यक्रम आणि ठिकाण यावर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षप्रमुख सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, आनंद शर्मा, मीरा कुमार आणि अंबिका सोनी यांचा समावेश होता.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणे व्यावहारिक नाही. भारत जोडो यात्रा रविवारी संध्याकाळी राजस्थानमध्ये दाखल झाल्यामुळे राहुल गांधी सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. (हेही वाचा: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.3 टक्क्यांवर)

खरगे यांनी ऑक्टोबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, काँग्रेस कार्यकारिणी (CWC) च्या जागी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला खरगे यांनी संघटनेत वरपासून खालपर्यंत जबाबदारीची गरज असल्याचे सांगून जे आपली जबाबदारी पार पाडू शकत नाहीत त्यांनी नव्या लोकांना संधी द्यावी, असे सांगितले. पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांनी प्रथम स्वतःची जबाबदारी निश्‍चित करून जनआंदोलनाच्या संदर्भात 30 ते 90 दिवसांत आराखडा तयार करावा, असेही ते म्हणाले.