गुजरातमधील (Gujarat) जुनागड जिल्ह्यातून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मदरशाच्या 25 वर्षीय मौलवीला किमान 7 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जुनागड जिल्हा पोलिसांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मौलवीव्यतिरिक्त, पोलिसांनी मदरशाच्या 55 वर्षीय ट्रस्टीलाही अटक केली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतरही या ट्रस्टीने मौलवीवर कोणतीही कारवाई केली नव्हती. पोलिसांनी सोमवारी (23 ऑक्टोबर 2023) या कारवाईची माहिती दिली. मोहम्मद अब्बास असे २५ वर्षीय मौलाना आरोपीचे नाव आहे. मौलाना मसाजच्या बहाण्याने लहान मुलांना खोलीत बोलावत असे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार , हे प्रकरण जुनागडमधील मंगरोळ पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथे 'मुफ्ती साहेब दाऊद फकिरा ट्रस्ट' आणि 'उलूम एज्युकेशन ट्रस्ट' मार्फत मदरसा चालवला जातो. या मदरशात स्थानिक मुलांबरोबरच बाहेरचे काही विद्यार्थीही शिकतात. सुमारे 2 वर्षांपूर्वी मौलाना मोहम्मद अब्बास मुलांना उर्दू आणि धार्मिक शिक्षण देण्यासाठी येथे आला होता. आता त्याच्यावर आरोप आहे की, तो मसाजच्या बहाण्याने विद्यार्थ्यांना आपल्या खोलीत बोलावत असे व येथे तो त्यांच्यावर अनैसर्गिक बलात्कार करत असे.
आपल्या वासनेची शिकार बनवल्यानंतर मौलाना अब्बास मुलांना तोंड बंद ठेवण्यासाठी धमकावत असे. काही मुलांना पैशाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. मौलाना अब्बासच्या या कृत्याची तक्रार मुलांनी मदरशाचे 55 वर्षीय विश्वस्त दाऊद फकिरा यांच्याकडे केली होती. या तक्रारीकडे त्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप होत आहे.
मौलानाच्या कुकर्माचा बळी ठरलेला एक 15 वर्षीय विद्यार्थ्याने मदरसामध्ये जाणे बंद केले होते. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याचे कारण विचारले असता त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. मुलाने सांगितले की, तो गेल्या 6 महिन्यांपासून मौलानाच्या वासनेचा बळी आहे. या कृत्याची माहिती समजल्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन मौलाना अब्बास आणि विश्वस्त दाऊद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 377, 323, 506 आणि 144 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: Russian YouTuber चा दिल्ली येथील सरोजिनी नगर परिसरात On Camera छळ, व्हिडिओ व्हायरल)
आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मौलाना अब्बास फरार झाला होता. पोलिसांना त्याचे सुरत येथील ठिकाण सापडले. रविवारी (22 ऑक्टोबर 2023) पोलिसांच्या पथकाने छापा टाकून मौलाना अब्बासला सुरत येथून अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी मदरशाचा ट्रस्टी दाऊद याला मदरशातून अटक करण्यात आली.