
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीतील (Gold Price) सतत वाढ होत आहे. गेल्या 49 दिवसांत सोन्याचा भाव 76,544 रुपयांवरून 86,020 रुपयांवर पोहोचला आहे, त्यामुळे त्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 9,506 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 86,020 रुपयांवर बंद झाल्यानंतर एमसीएक्स सोन्याच्या किमतीत साप्ताहिक सुमारे 1.57 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीत चांगली वाढ झाली असली तरी, या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता यामुळे सोन्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीही वाढत आहेत. बुलियन बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील वाढ इथेच थांबणार नाही. या वर्षी सोन्याची किंमत कितीपर्यंत पोहोचू शकते? ते जाणून घेऊयात.
धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत काय असेल?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भू-राजकीय अनिश्चितता, चलनवाढीचा दबाव आणि रुपयाची सततची घसरण यामुळे सोन्याच्या किमतीत तेजी राहील. तांत्रिकदृष्ट्या, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 2900 डॉलरच्या पातळीकडे जात आहे, ज्याला 2845/2826 डॉलर चा आधार आहे. जर आपण भविष्याबद्दल बोललो तर, अल्पावधीत चढ-उतार येऊ शकतात. परंतु दीर्घकाळात गती कायम राहील. धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत एमसीएक्सवर सोने 87 हजार रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकते. जर असे झाले तर भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90 हजार रुपयांपर्यंत सहज पोहोचेल. (हेही वाचा - Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! प्रति 10 ग्रॅम 87,210 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला दर)
दरम्यान, सोन्याशिवाय चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सॅमको सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, पुढील 12 महिन्यांत चांदी 1,17,000 रुपयांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल. डिसेंबर 2022 पासून 41% वाढ झाली असली तरी, चांदीमध्ये आणखी एक वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2022 पासून चांदीने निफ्टीला मागे टाकून या कालावधीत 26% परतावा दिला आहे. (हेही वाचा -Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले; मुंबई, पुणे शहरात काय आहेत आजचे दर? पहा)
शुक्रवारी, एमसीएक्सवर चांदीचा एप्रिल करार 222 रुपयांनी कमी होऊन 96,891 रुपयांवर व्यवहार करत होता. लवकरच चांदी पुन्हा एकदा 1 लाख रुपयांचा आकडा गाठू शकते. डॉलर निर्देशांक मधील कमकुवतपणा हा चांदीसाठी एक मोठा सकारात्मक घटक आहे. चांदीचा वापर इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेलसारख्या विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी होतो.