दरवर्षी सरासरी 1.5 लाख लोक भारताचे नागरिकत्व (Indian Citizenship) सोडत आहेत. भारताचे नागरिकत्व सोडणाऱ्यांसाठी परदेशात अमेरिका ही पहिली पसंती आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गृह मंत्रालयाने भारताचे नागरिकत्व सोडलेल्यांची आकडेवारी जाहीर केली व त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, 2021 मध्ये एकूण 1,66,370 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आणि परदेशात स्थायिक झाले. यापैकी 78,284 लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त केले आहे.
आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 1,44,017 लोकांनी आणि 2020 मध्ये एकूण 85,256 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. यामध्ये अमेरिकेचे 78,284 लोकांनी, ऑस्ट्रेलियाचे 23,533, कॅनडाचे 21,597 आणि 14,637 लोकांनी युनायटेड किंगडमचे नागरिकत्व घेतले आहे. नित्यानंद राय बहुजन समाज पक्षाचे नेते हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीच्या आधारे सांगितले की, भारताच्या नागरिकांनी गेल्या एका वर्षात एकूण 103 देशांचे नागरिकत्व घेतले आहे.
गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये स्थायिक होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, 2019 मध्ये एकाही भारतीय नागरिकाने पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले नाही, तर 2020 मध्ये 7 भारतीय नागरिकांनी आणि 2021 मध्ये 41 जणांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले. 2021 मध्ये एका व्यक्तीने बांगलादेशचे नागरिकत्वही घेतले. (हेही वाचा: बिल गेट्स यांना मागे टाकत Gautam Adani बनले जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या टॉप 10 श्रीमंतांची यादी)
भारतीयांनी भारताचे सोडून कॅनडा, यूएसए, यूके आणि ऑस्ट्रेलियायासोबत बहारीन, बांगलादेश, बेल्जियम, इराण, इराक, जमैका, इटली, लाओस, मेक्सिको, न्यूझीलंड, पोलंड, ओमान, पाकिस्तान, कतार, आयर्लंड, यूएई, थायलंड, युगांडा, स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, रशिया, रोमानिया, फिजी, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी आणि केनिया अशा देशांचे नागरिकत्व घेतले आहे.