भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी जगातील श्रीमंतांच्या (Richest Person in the World) यादीत मोठे स्थान प्राप्त केले आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार (Forbes World’s Richest List) गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याच वेळी, गेट्स 102 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, संपत्तीच्या बाबतीत अदानी यांच्यासमोर केवळ तीन उद्योगपतींची नावे आहेत.
बिल गेट्स यांनी घोषणा केली होती की, ते त्यांच्या संपत्तीपैकी $20 अब्ज चॅरिटीसाठी देतील. त्यांच्या या निर्णयामुळे ते श्रीमंतांच्या यादीत एक स्थान घसरून पाचव्या स्थानावर आले आहेत. या यादीत टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 229 अब्ज डॉलर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्रेंच लक्झरी वस्तू कंपनी LMVH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांचे कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 145 अब्ज डॉलर आहे. त्याच वेळी, अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती 136 डॉलर अब्ज आहे.
भारतासोबतच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा टॅग दीर्घकाळ मिरवणारे मुकेश अंबानी हे संपत्तीबाबतच्या शर्यतीत अदानी यांच्याहून सातत्याने मागे पडत आहेत. फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानी-अदानी यांच्यातील हे अंतर 26 डॉलर बिलियनपेक्षा जास्त झाले आहे. अंबानी यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर आहे. पेट्रोलियम कंपन्यांवर विंडफॉल टॅक्स लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अलीकडच्या काही दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती, त्यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. (हेही वाचा: डॉलरपुढे घसरला रुपाया; नागरिकांच्या जीवनावर काय होतो परिणाम? घ्या जाणून)
या यादीमध्ये सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमे लॅरी एलिसन, वॉरन बफे, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांची नावे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 88 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. संपत्ती वाढवण्याच्या बाबतीत अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे नाव अग्रस्थानी येते. 2022 मध्ये, त्यांची संपत्ती सुमारे $ 23 अब्जने वाढली आहे, जी जगातील सर्वाधिक आहे. 2021 आणि 2020 मध्ये अदानी यांच्या संपत्तीत 40-40 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.