पंजाब आणि हरियाणामध्ये या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेले पुराचे पाणी अनेक भागांतून ओसरू लागले असून दोन्ही राज्यांतील बाधित भागात मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. पंजाबमधील 14 आणि हरियाणातील 13 जिल्हे पावसाने प्रभावित झाले आहेत आणि दोन्ही राज्यांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 55 लोकांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 29 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हरियाणामध्ये ही संख्या 26 आहे. पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 25,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर हरियाणामध्ये 5,300 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: पुढील चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्याता, विदर्भात यलो अलर्ट)
हरियाणाच्या यमुनानगरमधील हथिनीकुंड बॅरेजमध्ये संध्याकाळी 6 वाजता 53,370 क्युसेक आणि रात्री 8 वाजता 54,619 क्युसेकचा प्रवाह होता. पूरग्रस्त भागात जलजन्य आजारांचा धोका आहे, त्यामुळे अशा प्रकारचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागात वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आली असून लोकांना औषधांचे वाटप करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. पंजाबमधील पतियाळा, मोगा, लुधियाना, मोहाली, जालंधर, संगरूर, पठाणकोट, तरनतारन, फिरोजपूर, फतेहगढ साहिब, फरीदकोट, होशियारपूर, रूपनगर आणि एसबीएस नगरसह 14 जिल्ह्यांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे.
त्याचवेळी अंबाला, फतेहाबाद, फरिदाबाद, पंचकुला, झज्जर, कुरुक्षेत्र, कर्नाल, कैथल, पानिपत, सोनीपत, पलवल, सिरसा आणि यमुनानगरसह हरियाणातील १३ जिल्हे मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात शनिवारी घग्गर नदीत दोन बंधारे फुटले, त्यानंतर हरियाणाच्या सीमेवर असलेल्या अनेक गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बोटीच्या सहाय्याने बाधित लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी बोटी पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणाहून लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना कोरडे रेशन, अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा अधिकाऱ्यांनी लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या समन्वयाने मदत आणि बचाव कार्य केले. यावेळी त्यांनी कोरडे रेशन, औषधे, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यांचेही वाटप केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फरीदाबाद पोलिस आणि एनडीआरएफ टीमच्या संयुक्त मदतकार्यांतर्गत शनिवारी सकाळी फरिदाबादच्या पूरग्रस्त भागातून 500 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.