FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

टोल पेमेंटसाठी फास्टॅगवर (FASTags) अवलंबून असलेल्या प्रवाशांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रवाशी त्यांचे फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी आता शेवटच्या क्षणावर विसंबून राहू शकत नाही, विशेषतः जर ते ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर. म्हणजेच इथून पुढे आयत्यावेळी फास्टॅग रिचार्ज करणे महागात पडू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनबाबत नवीन नियम अपडेट केले आहेत. हे नवीन नियम येत्या 17 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. फास्टॅग ही भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे संचालित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. ही प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांच्या विंडस्क्रीनवर लावलेल्या टॅगद्वारे टोल शुल्क स्वयंचलितपणे वसूल करते. यामुळे वाहनचालकांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, ज्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते.

सुधारित नियमांनुसार, फास्टॅगमधील बॅलन्स व्हॅलिडेशनबाबत केलेले बदल ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता जर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला असेल, तर टोल प्लाझावर पेमेंट नाकारण्यापूर्वी किंवा दंड आकारायच्या आधी तुमच्याकडे समस्येचे निराकरण करण्यासाठी 70 मिनिटांचा वेळ असेल.

एनओईसीआयच्या परिपत्रकानुसार, अपडेट केलेल्या नियमांनुसार, जर तुमचे खाते तर टोल प्लाझा पोहोचण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट असेल, कमी शिल्लक असेल, केवायसी पूर्ण नसेल किंवा फास्टॅगशी वाहनाचे तपशील जुळत नसतील, तर फास्टॅग व्यवहार नाकारले जातील. याव्यतिरिक्त, टोल रीडरने तुमचा फास्टॅग स्कॅन केल्यानंतरही तुमचे खाते 10 मिनिटांपर्यंत ब्लॅकलिस्ट राहिले तरीही व्यवहार नाकारला जाईल. याचा अर्थ वापरकर्त्यांना वरील कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी एकूण 70 मिनिटे- टोल नाक्यावर येण्यापूर्वी 60 मिनिटे आणि नंतर 10 मिनिटे-आहेत.

उदाहरणार्थ, जर तुमचा फास्टॅग सकाळी 10 वाजता ब्लॅकलिस्ट झाला असेल आणि तुम्ही सकाळी 11.30 वाजता टोल प्लाझावर पोहोचलात, तर 70 मिनिटांच्या आत तुम्ही समस्येचे निराकरण केले नाही तर तुमचा व्यवहार नाकारला जाईल. मात्र, जर तुम्ही टोल रीडिंगच्या 10 मिनिटांच्या आत तुमचे खाते रिचार्ज केले किंवा तुमचे केवायसी अपडेट केले, तर सिस्टम पेमेंट प्रक्रिया करेल आणि तुमच्याकडून दुप्पट रक्कम घेण्याऐवजी फक्त मानक टोल शुल्क आकारले जाईल.

फास्टॅग खाते ब्लॅकलिस्ट झाले असल्यास किंवा त्यात पुरेसा शिल्लक रक्कम नसेल, तर वाहनचालकांना त्वरित सूचना मिळेल. सूचना मिळाल्यानंतर, वाहनचालकांना 60 मिनिटांच्या आत खाते रीचार्ज किंवा इतर आवश्यक दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतर, अतिरिक्त 10 मिनिटे दिली जातील, ज्यामध्ये खाते स्थिती अद्यतनित होईल. जर 70 मिनिटांच्या आत समस्या सोडवली नाही, तर टोल प्लाझावर टोल शुल्काची वसुली नाकारली जाईल आणि वाहनचालकांना रोख रकमेने टोल भरावा लागेल. (हेही वाचा: Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडवरील हाजी अली ते मरीन ड्राइव्ह इंटरचेंज वाहतुकीसाठी खुला; अंतिम लिंक मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता)

दरम्यान, त्रासमुक्त टोल व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी, फास्टॅग वापरकर्त्यांनी टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी त्यांच्या खात्यांमध्ये पुरेशी शिल्लक राखली पाहिजे. ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी केवायसी पशील नियमितपणे अपडेट करणे देखील आवश्यक आहे. तसेच लांब प्रवासाला जाण्यापूर्वी फास्टॅगची स्थिती तपासायला हवी, जेणेकरून संभाव्य समस्या लवकर ओळखण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत होऊ शकते.