राजधानी दिल्लीमध्ये जमलेल्या 200 हून अधिक शेतकऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीने आपले आंदोलन (Farmers Protest in Delhi) सुरु ठेवले. हे सर्व शेतकरी तामिळनाडू राज्यातून दिल्ली येथील जंतरमंतर येथे जमले आहेत. आज त्यांनी मोबाईल टॉवरवर (Mobile Tower) चढून आंदोलन केले. शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, नद्यांबाबत केंद्र सरकारचे धोरण, सातत्याने वाढत चाललेले खतांचे दर, शेतमालास बाजारात असणारी मागणी आणि होणारा पुरवठा, त्यासाठी केंद्र सरकारने अंगीकारलेले आयात-निर्यातीचे धोरण या सर्व मुद्द्यांवरुन आंदोलन केले. आंदोलनाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारचे लक्ष्य वेधून घेऊ पाहात आहेत.
केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी
आपले प्रश्न लोकांपर्यंत आणि खास करुन सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी या शेतकऱ्यांनी विविध पद्धतींचा अवलंब केला आहे. ज्यामध्ये मोबाईल टॉवरवर चढणे, गळ्यामध्ये हाडे आणि डोक्यांच्या कवट्यांच्या माळा परिधान करणे, यांसह सरकारविरोधी घोषणा आणि शेतकरी एकजूटीचा विजय असो हा नारा, यांसारख्या बाबींचा समावेश आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी आल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत. (हेही वाचा, Girl Climbs Mobile Tower Video Viral: बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीचा मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' ड्रामा; व्हिडिओ व्हायरल)
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम
सध्या देशभरात लोकसभा निवडणूक 2024 चे वातावरण आहे. देशभरात निवडणूक सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झाले आहे. मात्र, बरोब्बर पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीत (लोकसभा 2019) मध्ये तत्कालीन सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करेन. इतकेच नव्हे तर देशातील सर्व नद्या एकमेकांशी जोडल्याजातील. पण प्रत्यक्षात सरकारने काहीच केले नाही. त्याउलट शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचेच काम सुरु असल्याचा या शेतकऱ्यांचा दावा आहे. (हेही वाचा, Punjab: काय सांगता? नोकरीसाठी तरुणाचे 200 फुट टॉवरवर 135 दिवस आंदोलन; शेवटी सरकारकडून मागण्या मान्य (Watch Video))
व्हिडिओ
#WATCH | Tamil Nadu farmers climbed atop mobile tower as they protest protest at Delhi's Jantar Mantar over their various demands pic.twitter.com/JKnttSYMeX
— ANI (@ANI) April 24, 2024
दरम्यान, अजूनही वेळ गेली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा हा लढा कायम सुरुच राहील. असे हे शेतकरी म्हणत आहेत. दिल्ली काय किंवा वाघा बॉर्डर काय, शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. या आधीही अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ बघ्याची भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विविध आरोप करत आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचा माराही केल्याचे या देशाने पाहिले. त्यामुळे तामिळनाडूतून दिल्ली येथे आलेल्या आणि मोबाईल टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार काय विचार करते याबाबत उत्सुकता आहे.