Farmer Protest: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा यांनी येत्या 27 सप्टेंबरला भारत बंदचा इशारा दिला आहे. तर याच्या समर्थनार्थ आज हरियाणातील गुरुग्राम मध्ये मशाल रॅली (Mashal Rally) आयोजित करण्याची तयारी केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मशाल रॅली शहरातील सदर बाजारातील परिसरात संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार असून सोहना रोड येथे संपणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणारे शेतकरी दिवा घेऊन चालणार आहेत. त्याचसोबत कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा साथ द्यावी यासाठी अपील करणार आहेत.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने अशी अपेक्षा केली आहे की, रॅलीमध्ये 200 हून अधिक लोक सहभागी होणार आहेत. एका सदस्याने म्हटले की, शेतकरी अन्नदाता असून नागरिकांनी कृषी विधेयकाला विरोध करावा.('पुढील 3-4 महिन्यात सार्या वाहन निर्मिती करणार्यांना वाहनामध्ये Flex Engines देणं सक्तीचं करण्याचे आदेश देणार' - मंत्री नितीन गडकरी)
देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षात 26 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन करत ते अद्याप ही सुरु ठेवले आहे. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, कृषी विधेयक मागे घ्यावे. परंतु केंद्राकडून सातत्याने नवे कृषी विधेयक हे त्यांच्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भारत बंद सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान संपूर्ण देशातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालय, शैक्षणिक आणि अन्य संस्था, दुकाने, उद्योग आणि कमर्शियल संस्थासह सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. तसेच रुग्णालय, मेडिकल आणि आपत्कालीन संस्थांना फक्त भारत बंद मधून सूट दिली जाणार आहे.