Representational Image | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील सोनभद्र (Sonbhadra) येथे काही दिवसांपूर्वी 3000 टन सोन्याची खाण सापडल्याच्या चर्चा सतत ऐकू येत आहेत, मात्र आता जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (Geological Survey Of India) तर्फे याबाबत स्पष्टीकरण देत हा दावा चुकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. GSI चे निर्देशक डॉ. जी. एस. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनभद्र येथे झालेल्या खणनात 3000 टन सोने आढळलेले नाही तर आतापर्यंत केवळ 160 किलो सोने सापडले आहे. याठिकाणी अजूनही खाणकाम सुरु आहे येत्याला दिवसात आणखीन अधिक प्रमाणात सोने सापडेल याची शक्यता टाळता येत नाही मात्र तूर्तास तरी जीएसआय कडून अशी आकडेवारी कुणीही दिलेली नाही इतकंच नव्हे तर सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या साठ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रोत असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला नाही असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार,सध्या जे सोने उत्तर प्रदेशात सापडल्याच्या चर्चा आहेत ते अधिकांश प्रमाणात हरदी आणि सोन पहाडी येथे सापडले आहे. या पहाडी क्षेत्रात  एंडालुसाइट, पोटॅशियम आणि लोखंड अशी वैविध्यपूर्ण खनिजे सापडण्याची शक्यता आहे. याभागात सध्या 15 दिवसांपासून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्व्हे केला जात असून या भागात दुर्मिळ असा युरेनियम धातू सापडण्याची अधिक शक्यता आहे.

PTI ट्विट

दरम्यान कोणत्याही राज्यत अशा प्रकारचा सोन्याचा मोठा साठा आढळल्यास त्याभागात खाणकाम करून त्या राज्यातील सरकारला माहिती पुरवून मगच आकडेवारी जाहीर केली जाते. सोनभद्र येथे साधारण 1998- 99 आणि 1999 -2000 या साली सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात सोने सापडले नव्हते त्यामुळे हा शोध काहीसा लांबणीवर टाकण्यात आला होता. याबाबत उत्तर प्रदेश सरकारला माहिती देण्यात आली होती. आणि आता या सोनभद्र येथे 3000 टन सोने सापडल्याच्या केवळ अफवा आहेत हे जीएसआयच्या स्पष्टीकरणातून समोर आले आहे.

आतापर्यंत भारतात सर्वात जास्त सोन हे कर्नाटक मधील हुती येथील खाणीतून प्राप्त झाले आहे. तर त्यापाठोपाठ आंधरप्रदेश, झारखंड, केरळ आणि मध्यप्रदेश मध्ये देखील सोने आढळले आहे.