लवकरच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शकयता आहे. अन्न मंत्रालयाने बुधवारी तेल उत्पादक कंपन्यांना एका आठवड्याच्या आत खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीमध्ये 10 रुपये/लिटरपर्यंत कपात करण्यास सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी खाद्यतेल उद्योग संस्था आणि उत्पादकांशी झालेल्या बैठकीनंतर जागतिक तेल किमतीत घसरण झाल्याने, खाद्य तेलाच्या किरकोळ किमती कमी करण्याबाबत चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली.
काल सचिव सुधांशू पांडे यांनी, अन्न मंत्रालयाने तेल उद्योग संस्था आणि उत्पादकांची बैठक बोलावली असल्याचे सांगितले होते. या बैठकीमध्ये कंपन्यांना जागतिक तेल किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोचवायला सांगू, असे ते म्हणाले होते. आता बैठकीमध्ये खाद्यतेलाच्या जागतिक किमतीतील घसरणीच्या अनुषंगाने देशातीत किरकोळ दर कमी करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच खाद्य तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती 400 डॉलरपर्यंत घसरल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्याचा फायदा अद्याप ग्राहकांपर्यंत पोहोचला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या सूचनांचे पालन करून कंपन्यांनी गेल्या महिन्यात किरकोळ कपात केली होती, जी पुरेशी मानली जात नाही. (हेही वाचा: कोरोना नंतर 73% भारतीय कंपन्या करत आहे 'हायब्रिड वर्किंग मॉडेल'चा विचार- CBRE सर्वेक्षण)
काही तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीत 10 ते 15 रुपयांनी कपात केली होती. मदर डेअरीच्या धारा (Dhara) या ब्रँडने विभागातील सर्व खाद्यतेलांची कमाल किंमत म्हणजेच एमआरपी 15 रुपयांपर्यंत कमी केली होती. दरम्यान, भारत आपल्या गरजेच्या 60 टक्क्यांहून अधिक खाद्यतेलाची आयात करतो. एसईए (SEA) नुसार 2020-21 विपणन वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) खाद्यतेलाची आयात जवळपास 131.3 लाख टन इतकी राहिली.