
ईडी (ED) कडून आज फेमा (FEMA) च्या अंतर्गत रवींद्रन बायजू (Raveendran Byju) आणि 'थिंक एंड लर्न प्राइवेट लिमिटेड' (बायजू ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्म) च्या बेंगलूरू मधील 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये त्यांनी काही दस्ताऐवजांना आणि डिजिटल डेटाला जप्त केले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, खासगी लोकांकडून आलेल्या विविध तक्रारींच्या आधारे ईडीने छापेमारीची ही कारवाई केली आहे. रवींद्रन बायजू यांना "अनेक" समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केले आणि ते कधीही तपास संस्थेसमोर हजर झाले नाहीत. त्याच्या कंपनीला 2011-2023 दरम्यान सुमारे 28,000 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.
ईडीच्या या छाप्याबाबत BYJUS ने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही अधिकाऱ्यांशी पूर्णपणे पारदर्शक राहून त्यांनी मागितलेली सर्व माहिती त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आमच्या सचोटीशिवाय आमच्याकडे काहीही नाही. आम्ही compliance आणि ethics राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.' असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान कंपनीने Advertisement आणि Marketing खर्चाच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपये विदेशी अधिकारक्षेत्रात पाठवले आहेत. कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षापासून आपली फायनान्शिअल स्टेटमेंट तयार केलेली नाहीत आणि खात्यांचे ऑडिट केलेले नाही जे अनिवार्य आहे. त्यामुळे, कंपनीने दिलेल्या आकडेवारीची खरी माहिती बँकांकडून तपासली जात आहे. अशी माहिती ईडीने दिली आहे. BYJU च्या कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे; केरळनंतर आता कर्नाटकातही कर्मचाऱ्यांनी आरोप केले.
अलीकडेच, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2023 च्या अहवालात, BYJU'S चा जगभरातील टॉप-10 युनिकॉर्न स्टार्ट-अप्समध्ये समावेश करण्यात आला होता. ज्यांचे मूल्यांकन कोविड-19 महामारीमुळे वाढले आहे. हुरुनच्या मते, या भारतीय कंपनीचे मूल्य $22 अब्ज इतके आहे.