Draupadi Murmu | (Photo Credit - Twitter)

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) भारताच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांच्यानंतर प्रथमच एका महिलेला या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या त्या दुसऱ्याच महिला आहेत. उल्लेखनीय म्हणजे मुर्मू यांच्या रुपात राष्ट्रपती होण्याची आदिवासी महिलेला प्रथमच संधी मिळाली आहे. द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव झाला आहे. द्रौपदी मुर्मू या भाजप प्रणीत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या. तर काँग्रेस प्रणीत युपीएकडून यशवंत सिन्हा रिंगणात होते. राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Election Result 2022) सुरुवातीपासूनच मुर्मू यांचे पारडे जड होते. त्या तुलनेत सिन्हा यांची ताकद फारच मर्यादित होती. असे असले तरीही युपीएची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याने सिन्हा यांना आणखीच फटका बसला.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देशभरातून जवळपास 99% लोकप्रतिनिधींनी मतदानाच हक्क बजावला. देशभरातून एकूण मतदानाचा विचार करता 10 राज्ये आणि एक केंद्रशाशित प्रदेशातून या निवडणुकीत 100% मतदान झाले. वर्गवारीच करायची तर 771 खासदार आणि 4025 आमदार अशा एकूण 4796 मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला. सुरुवातीपासूनच मुर्मू यांचे पारडे जड होते. त्यामुळे सहाजिकच मतमोजणीवेळीही त्याची प्रचिती पहिल्या फेरीपासून आली. पहिल्या फेरीपासून मुर्मू आघाडीवर राहिल्या. सिन्हा यांची मात्र मोठी दमछाक झाली. त्यांना अपेक्षीत मते मिळवितानाही मोठा आटापीटा करावा लागला.

ट्विट

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी आपापल्या परिने पाठिंबा मिळविण्यासठी व्यक्तीगत आणि आपापल्या पक्ष, आघाडीच्या वतीने सामूहिक प्रयत्न केले. दोघांनीही देशभर दौरे काढले आपल्या समर्थकांच्या गाठिभेटी घेतल्या. शक्य त्या ठिकाणी विरोधकांशीही संवाद साधला. जेणेकरुन आपल्या मतांमध्ये वाढ होईल. विजय अधिक सोपा होईल. दोघांनीही चांगले प्रयत्न केले असले तरी, मतदारांनी द्रौपदी मुर्मू यांना अधिक पसंती दिली.

ट्विट

द्रौपदी मुर्मू या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपतो आहे. त्यानंततर राष्ट्रपती पदाची सूत्रे मुर्मू यांच्याकडे जातील. द्रौपदी मुर्मू या पहिल्या फेरीत आघाडीवर होत्याच. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीआखेर मुर्मू यांना 812 मतांनी आघाडी मिळाली. त्यांना दुसऱ्या फेरीत 1349 मते मिळाली. या मतांचे मूल्य 4,83,299 इतके होते. त्या तुलनेत सिन्हा यांना केवळ 537 मते मिळाली. ज्याचे मुल्य 1,89,876 इतके होते.

ट्विट

दरम्यान, विरोधी आघाडीतील (यूपीए) 17 खासदारांची मते देशभरातून फुटली. हे खासदार युपीए किंवा भाजप विरोधी गटातील असले तरी त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मात्र द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. अखेर मुर्मू यांचा विजय झाला.