Domestic Violence (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजस्थानमधील अलवर (Alwar) जिल्ह्यातील भिवडी येथे घरगुती हिंसाचाराचे (Domestic Violence) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या पत्नीवर अत्याचाराचा आरोप केला आहे. त्रासलेल्या मुख्याध्यापकांचा आरोप आहे की, त्यांची पत्नी त्यांना पॅन, काठी तसेच बॅटने मारहाण करते. पत्नीच्या या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी पुरावे गोळा करता यावेत म्हणून त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. आता या कॅमेऱ्यामधील एक फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पत्नी या मुख्याध्यापक पतीला बॅटने मारहाण करताना दिसत आहे.

मुख्याध्यापकांना त्यांच्या पत्नीने मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले आहे. एवढेच नाही तर तिने त्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलही केले आहे. अत्याचार झालेल्या मुख्याध्यापकांनी आता संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सहसा कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे महिलांच्या बाजूने येतात, परंतु भिवडीमध्ये एक पुरुष कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरला आहे.

कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेली ही व्यक्ती सरकारी शाळेची मुख्याध्यापक आहे. हरियाणातील सोनीपत येथे राहणाऱ्या सुमनसोबत 7 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला काही दिवस आयुष्य सुरळीत चालले, मात्र हळूहळू पत्नीच्या पतीवरील अत्याचारात वाढ होऊ लागली. सध्या परिस्थिती अशी आहे की, पत्नी वरचेवर पतीचा छळ करत आहे. कधी क्रिकेटच्या बॅट तर कधी स्वयंपाकच्या तव्याने त्यांना मारहाण करत असते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मुख्याध्यापकाने संरक्षणासाठी भिवडी न्यायालयात धाव घेतली आहे. (हेही वाचा: Shocking! सुनेचा जडला सासऱ्यावर जीव; दोन मुलांना मागे सोडून दोघेही गेले पळून)

या मारहाणीमुळे मुख्याध्यापकांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. पत्नीच्या भीतीने ते जवळजवळ 1 महिना घरी गेले नव्हते. तसेच त्यांनी आपल्या पत्नीवर कधी हातही उगारला नव्हता. मात्र आता पत्नीने सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांनी कोर्टाचा आसरा घेतला आहे. या जोडप्याला एक मुलगाही आहे. सुमन तिच्या मुलासमोर पतीला बेदम मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.