Domestic Airfare Surge: या उन्हाळ्यात देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील. विस्तारा एअरलाइन्सने उड्डाणे रद्द केल्यामुळे आणि प्रवाशांची जोरदार मागणी तसेच इंधन खर्चामध्ये वाढ यामुळे हवाई भाडे 20-25 टक्क्यांनी वाढले आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी उन्हाळ्यात विमान प्रवासाची मागणी जास्त असते. मात्र यंदा विमान उद्योगाला मागणीनुसार क्षमता वाढवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
या काळात टाटा समूहाच्या विस्तारा एअरलाइन्सच्या शंभरहून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे हवाई भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वैमानिकांच्या संतापाचा सामना करत एअरलाइनने आपली एकूण क्षमता दररोज 25-30 उड्डाणे म्हणजे 10 टक्क्यांनी कमी केली आहे. ट्रॅव्हल वेबसाइट इक्सिगोच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, 1 ते 7 मार्च या कालावधीच्या तुलनेत काही एअरलाइन्सच्या भाड्यात 1 ते 7 एप्रिल या कालावधीत 39 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
या कालावधीत दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट्सचे एकतर्फी भाडे 39 टक्क्यांनी वाढले, तर दिल्ली-श्रीनगर फ्लाइट्ससाठी ते 30 टक्क्यांनी वाढले. विश्लेषणानुसार, दिल्ली-मुंबई फ्लाइट सेवेच्या बाबतीत 12 टक्के आणि मुंबई-दिल्ली सेवेच्या बाबतीत 8 टक्के भाडे वाढ झाली आहे. ट्रॅव्हल पोर्टल यात्रा ऑनलाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विमान आणि हॉटेल व्यवसाय) भरत मलिक म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांचा समावेश असलेल्या सध्याच्या उन्हाळी उड्डाण वेळापत्रकात सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Theft in Yesvantpur-Kannur Express: यशवंतपूर-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सामानाची चोरी; मौल्यवान वस्तू लुटल्या)
मलिक म्हणाले, ‘विस्ताराची उड्डाणे 10 टक्के कमी करण्याच्या निर्णयामुळे प्रमुख देशांतर्गत मार्गावरील तिकिटांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. आम्ही भाड्यात लक्षणीय वाढ पाहिली आहे. दिल्ली-गोवा, दिल्ली-कोची, दिल्ली-जम्मू आणि दिल्ली-श्रीनगर या प्रमुख मार्गांवर किंमती सुमारे 20-25 टक्क्यांनी वाढल्या आहेत.’ शेवटच्या वेळी फ्लाइट रद्द झाल्यामुळे हा तात्पुरता अडथळा आहे. फ्लाइटचे वेळापत्रक सामान्य झाल्यावर, भाडे काही आठवड्यांत स्थिर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.