Dispute Over Birthplace of Lord Hanuman: भगवान हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला? कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अंजनीपुत्राच्या जन्मभूमीसंदर्भात उफाळला वाद
Hanuman (Photo Credits: @rpsingh/ Twitter)

अयोध्येतील राम मंदिरानंतर आता भगवान हनुमानाच्या (Lord Hanuman) जन्मभूमीसंदर्भात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक (Karnataka) आणि आंध्र प्रदेशने (Andhra Pradesh) आपापल्या राज्यात अंजनीपुत्राचा जन्म झाल्याचा दावा केला आहे. याआधीही हा वाद उद्भवला होता, म्हणूनच याचे निराकरण करण्यासाठी डिसेंबरमध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) ने आठ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. आता शिवमोगाच्या एका मठ प्रमुखांनी दावा केला आहे की, हनुमानाचा जन्म उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे झाला होता. यापूर्वी कर्नाटकामधून दावा केला जात होता की, हनुमानाचा जन्म किष्किन्धाच्या अंजनाद्री टेकडीवर झाला होता.

त्याचबरोबर आंध्र प्रदेशचादेखील या विषयावर स्वतंत्र दावा आहे. ते म्हणतात की, हनुमानजीचा जन्म तिरुपतीमध्ये असलेल्या 7 पर्वतांपैकी एकामध्ये झाला होता, ज्याला अंजनाद्री देखील म्हणतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिवमोगामधील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख राघवेश्वर भारती यांनी रामायणाचे उदाहरण दिले आहे, ज्यामध्ये हनुमानजी सीतेला सांगतात की त्यांचा जन्म गोकर्णच्या काठावर झाला होता. यावरून राघवेश्वर भारती म्हणाले की, रामायणातील हा पुरावा सिद्ध करतो की गोकर्ण हेच हनुमानजींचे जन्मस्थान आहे व किश्किंथाची अंजनाद्री ही त्यांची कर्मभूमी आहे.

या दाव्यानंतर आता तिरुमला तिरुपती देवस्थानमला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी या प्रकरणात एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे, जी पौराणिक तथ्यांच्या आधारे तपास करत आहे. कदाचित येत्या 21 एप्रिल रोजी समिती या प्रकरणात ज्या गोष्टी समोर आल्या त्या सादर करेल. हा दावा अतिशय संवेदनशील मुद्दा असल्याने, पॅनेलमध्ये केवळ मंदिराशी संबंधित लोकच नाहीत तर सर्व प्रकारचे तज्ञ आहेत. यात वैदिक तज्ञ, इस्रोचे शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभागातील तज्ञांचा समावेश आहे. (हेही वाचा: हरिद्वार येथील कुंभमेळा ठरतोय Coronavirus उद्रेकाचे कारण, दोन दिवसांमध्ये 1,000 जण COVID 19 संक्रमित)

टीडीडीचे कार्यकारी अधिकारी के एस जवाहर रेड्डी यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे पौराणिक व पुरातत्व पुरावे आहेत. या आधारे ते सिद्ध करू शकतात की हनुमानाचा जन्म तिरुपतीच्या अंजनाद्री पर्वतावर झाला होता. दुसरीकडे धारवाड विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास विभागाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर ए सुंदर यांनी, बेल्लारी प्रदेशातील अशा अनेक पेंटिंग्ज चिन्हांकित केल्या आहेत, ज्यात या व्यक्तीच्या मागच्या बाजूला एक लहान अवयव दिसून येतो. हंपी आणि त्याच्या आसपास अनेक हनुमान मंदिरे आहेत. यावरून अशी मंदिरे इथेच का आहेत, तिरुमालाला का नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.