दिल्ली हवा प्रदूषण (Photo Credits: ANI)

स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर व्हिज्युअल, या जागतिक स्तरावरील हवा-गुणवत्तेचा डेटा गोळा करणार्‍या संस्थेने नुकतेच जगातील सर्वात प्रदूषित शहरांची (World’s Most Polluted City) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राजधानी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. जगातील सहावे आणि नववे प्रदूषित शहर म्हणून कोलकाता (Kolkata) आणि मुंबई (Mumbai) शहरांचाही या यादीमध्ये समावेश आहे. एअर व्हिज्युअलचा डेटा वारंवार अपडेट केला जातो. म्हणून एअर क्वालिटी इंडेक्सची गणना आणि क्रमवारीत बदल हा दिवसेंदिवस बदलत असतो.

दुसरीकडे खाजगी वेदर एजन्सी स्काइमेटनेही जगातील 10 सर्वात जास्त प्रदूषित शहरांचा अहवाल जारी केला आहे. यामध्येही दिल्ली अग्रस्थानी असून, कोलकाता पाचव्या तर मुंबई 9 व्या स्थानी आहे. याबाबत बोलताना स्कायमेट ने सांगितले- दिल्लीतील हवेची गुणवत्ता गेल्या नऊ दिवसांपासून चिंताजनक पातळीवर आहे. इतके दिवस प्रदूषणाची ही पातळी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन दिवस दिल्लीतील सर्व शैक्षणिक संस्था आणि स्वच्छ इंधनाने न चालविणारे उद्योग बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्लीतील 13 ठिकाणी एअर प्युरिफायर टॉवर्स बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा: राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ; Delhi-NCR मधील शाळांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी सुट्टी)

दरम्यान, एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) ला 0-50 दरम्यान 'चांगले', 51-100 दरम्यान 'समाधानकारक', 101 ते 200 मधील 'सामान्य', 201 ते 300 मधील 'खराब', 301 ते 400 दरम्यान 'खूप खराब' म्हणून रेटिंग दिले गेले आहे. तसेच  401 ते 500 दरम्यान 'गंभीर' मानले जाते. तसेच हवेतील पीएम 10 ची पातळी 100 आणि पीएम 2.5 60 मायक्रोग्राम प्रति मीटरपेक्षा जास्त नसावी.