(Images Used for Representational purposes only । Photo Credits: pixabay)

तुम्ही जर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल किंवा विमा कंपनीकडून एखादी पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मार्गांनी लोकांचा डेटा लीक होत आहे किंवा तो विकला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. आता 10 पैकी 6 भारतीयांनी त्यांच्या कर्ज सेवा प्रदात्यांद्वारे (Loan Service Providers) वैयक्तिक डेटाचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले आहे. यासह 10 पैकी 4 भारतीयांनी यासाठी विमा पुरवठादार किंवा बँकांना दोष दिला आहे.

एका नवीन अहवालातून ही बाब समोर आली आहे. ऑनलाइन समुदाय मंच LocalCircles च्या अहवालानुसार, विद्यमान कर्ज असलेल्या जवळपास 59 टक्के लोकांना गेल्या पाच वर्षांत ईमेल, फोन कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे अन्य कर्ज देणाऱ्या संस्थेकडे जाण्यासाठी पर्यायी सेवा पुरवठादारांनी संपर्क साधला आहे. विद्यमान विमा पॉलिसी असलेल्यांपैकी 40 टक्के लोकांना स्पर्धात्मक ऑफरसह संपर्क साधण्यात आला आहे.

दुसरीकडे, बँक खाती असलेल्या 34 टक्के जणांना त्याच प्रकारचे दुसरे बँक खाते उघडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. त्यापैकी 23 टक्के लोकांना अनेक वेळा संपर्क साधला होता आणि 11 टक्के लोकांना एकदा किंवा दोनदा संपर्क साधला होता. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘ज्यांच्या डेटाशी कर्ज एजन्सी, विमा कंपन्या आणि बँकांनी तडजोड केली आहे, अशा नागरिकांचा असा विश्वास आहे की ही गोष्ट अंतर्गत आणि बाह्यरित्या कमकुवत डेटा संरक्षण प्रशासनामुळे झाले आहे. (हेही वाचा: एलपीजी गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्यांवर सरकारने घेतला मोठा निर्णय! घरगुती गॅस सिलिंडरमध्ये आता असणार QR कोड)

लोकांचा असा विश्वास आहे की, वित्तीय संस्था त्यांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या जबाबदारीत अपयशी ठरत आहेत. अशा डेटाशी तडजोड कशी होत आहे, याबद्दल विचारले असता, बहुसंख्यांना असे वाटले की वित्तीय संस्थांमधील प्रशासन हे त्यास कारणीभूत आहे. 53 टक्के लोकांना असे वाटले की, अशा वित्तीय संस्थांच्या सेवा प्रदात्यांनी त्यांच्या वैयक्तिक डेटाशी तडजोड केली आहे, तर 38 टक्के लोकांना वाटले की यामध्ये संस्थांचे कर्मचारी देखील सामील आहेत. 43 टक्के लोकांना असेही वाटले की, संस्था स्वतःच त्यांच्या माहितीशी तडजोड करत आहेत किंवा ती माहिती विकत आहेत