Cyclone Yaas: तौक्ते वादळानंतर आता 23-24 मे दरम्यान 'यास चक्रीवादळा'चा धोका; 'या' राज्यांना अलर्ट जारी 
Cyclone Representative (Photo Credits: ANI)

नुकतेच आलेल्या चक्रीवादळ तौक्तेने  (Cyclone Tauktae) गुजरात व महाराष्ट्रातील बर्‍याच भागात हाहाकार माजवला आहे. गुजरातमध्ये वादळामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर, महाराष्ट्रात 6 पेक्षा जास्त लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. यासह वादळामुळे अनेक ठिकाणी विनाशाही ओढवला आहे. या सगळ्यादरम्यान, आता पाच दिवसानंतर आणखी एक चक्रीवादळ येणार असल्याची बातमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 23-24 मे दरम्यान चक्रीवादळ 'यास' (Cyclone Yaas) बंगालच्या उपसागराला भिडेल. यावेळी ओमानने या चक्रीवादळाला हे नाव दिले आहे.

हवामानतज्ज्ञ ‘यास’ वादळाला अत्यंत धोकादायक मानत आहेत. या चक्रीवादळाचा परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. भारत हवामान खात्यातील चक्रीवादळ विभागाच्या प्रभारी सुनीता देवी म्हणाल्या की, पुढच्या आठवड्यात पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग परिस्थितीवर नजर ठेवून आहे. कमी दाब यंत्रणेची गती वाढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. देवी म्हणाल्या की, एसएसटी बंगालच्या उपसागरावर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 31 डिग्री आहे. हे सरासरीपेक्षा 1-2 अंश जास्त आहे. सर्व समुद्री आणि वातावरणीय परिस्थिती चक्रीवादळाला अनुकूल आहे. (हेही वाचा:  तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील 'बार्ज पी-305' जहाजात अडकलेल्या 146 जणांची सुटका; 130 जण बेपत्ता)

स्पेशल अलर्टमध्ये म्हटले गेले आहे की, 23-24 मे रोजी चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते 27 ते 29 मे दरम्यान जमीनदोस्त होऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. यावेळी, वाऱ्याचा वेग अंदाजे 140 ते 150 कि.मी. इतका असेल.

दरम्यान, हवामान खात्याने सांगितले की, तौक्ते चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवरुन 'अत्यंत तीव्र चक्रीय वादळ' म्हणून गेले आणि हळूहळू 'तीव्र चक्रीवादळा' मध्ये रुपांतरीत झाले. नंतर त्याची तीव्रता 'चक्रीय वादळा'सारखी कमी झाली. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, यावेळी 16, 000 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले.  40 हजाराहून अधिक झाडे आणि 70 हजाराहून अधिक विद्युत खांब उखडले गेले आहेत तर, 5951 गावातील वीज गेली होती.