Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील 'बार्ज पी-305' जहाजात अडकलेल्या 146 जणांची सुटका; 130 जण बेपत्ता
Indian Navy rescue operation (PC - ANI)

Cyclone Tauktae Update: अरबी समुद्रात चक्रीवादळ 'तौक्ते' मुळे समुद्रात जहाजावर अडकलेल्या 146 जणांनी भारतीय नौदलाने सुटका केली असून बाकीच्यांचा शोध अद्याप सुरू आहे. अद्याप या जहाजावरील 130 जण बेपत्ता आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाने मंगळवारी सकाळी पी -81 बचाव कार्यासाठी तैनात केले. शोध आणि बचाव कार्यासाठी हे नौदलाचे बहु-मिशन सागरी गस्त विमान आहे. चक्रीवादळ तौक्तेने महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या भागात मुसळधार वारा आणि पाऊस पडत आहे. यादरम्यान, मुंबईजवळील समुद्रात एक बोट अडकली होती, त्यात सुमारे 273 लोक होते. वादळामुळे समुद्राच्या मध्यभागी ही बोट बुडाली, त्यानंतर भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केले आणि मंगळवार सकाळपर्यंत एकूण 146 जणांची सुटका करण्यात आली. (वाचा - Cyclone Tauktae Impact: मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, पुढील काही तासात वेगाने वारे वाहण्याची शक्यता-IMD)

भारतीय नौसेनेच्या जवानांकडून जहाजावर अडकलेल्या लोकाना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता आणि इतर मोठी जहाजेही या मोहिमेमध्ये गुंतलेली आहेत. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, इंडियन नेवल P8I च्या मदतीने बचाव अभियान राबवले जात आहे. नौदलाची हेलिकॉप्टरही या कामात गुंतलेली आहेत. अद्याप याठिकाणी शोधमोहिम सुरू आहे.

आपल्या बचाव मोहिमेदरम्यान नौदलाने सांगितले की 273 जणांना घेऊन जाणारी मोठी बोट (बार्ज 305) बुडली होती, त्यातील 146 जणांना वाचवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कुलाब्यापासून काही अंतरावर एक नाव अडकली होती, ज्यात 137 लोक होते. त्यांना नौदलाच्या जवानांकडून वाचवण्यात येत आहे.

चक्रीवादळ तौक्तेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपले बरेच जवान तैनात केले आहेत. जवळपास 11 डायव्हिंग टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. जे राज्य सरकारच्या शिफारशीनुसार पुढे पाठविले जातील. वादळामुळे काही मोठे नुकसान झाले असेल तर त्यासाठी दुरुस्ती व बचाव पथक तयार करण्यात आले आहे.