Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

सध्या देशात सायबर फसवणूक (Cyber Fraud) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा रॅकेटसाठी चिनी सायबर गुन्हेगार (Chinese Cybercriminals) भारतातील सुमारे 3,000 लोकांचा वापर करत आहेत. असे गुन्हे घडवून आणण्यासाठी कंबोडियात तस्करी केलेल्या भारतीय महिला आणि पुरुषांचे शोषण केले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. अहवालानुसार, चीनचे सायबर गुन्हेगार भारतातील लोकांना न्यूड व्हिडिओ कॉल करून हनी ट्रॅप करण्यासाठी महिलांचा वापर करत आहेत.

हे संपूर्ण प्रकरण तेलंगणातील एका व्यक्तीने उघड केले आहे. मुन्शी प्रकाश असे या व्यक्तीचे नाव असून, तो स्वतः चिनी गुन्हेगारांच्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. प्रकाशने सांगितले की, आरोपी हनी ट्रॅपद्वारे प्राप्त केलेल्या पैशाचे क्रिप्टोकरन्सी आणि चीनी युआनमध्ये रूपांतर करून नफा कमावतात.

वृत्तानुसार, तेलंगणातील रहिवासी मुन्शी प्रकाशने बीटेक केल्यानंतर हैदराबादमध्ये एका आयटी कंपनीत नोकरी सुरु केली. त्यानंतर परदेशात नोकरीसाठी त्याने जॉब साइट्सवर आपले प्रोफाईल पोस्ट केले होते आणि येथून तो सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला. प्रकाशने सांगितले की, विजय नावाच्या एका एजंटने कंबोडियातून फोन करून त्याला ऑस्ट्रेलियात नोकरीची ऑफर दिली. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी परदेशातील ट्रॅव्हल हिस्ट्री असणे गरजेचे असल्याचे सांगत, त्याने प्रकाशला मलेशियाची तिकिटे दिली.

त्यानंतर 12 मार्च रोजी प्रकाशला क्वालालंपूरहून नोम पेन्ह (कंबोडियाची राजधानी) येथे नेण्यात आले. तिथे विजयच्या जोडीदाराने त्याच्याकडून 85,000 रुपयांचे अमेरिकन डॉलर्स घेतले. यानंतर तिथल्या चिनी नागरिकांनी प्रकाशचा पासपोर्ट जप्त करून, त्याला क्रोंग बावेत नेले. ते एक मोठे क्षेत्र असून, तिथे अनेक टॉवर आहेत. त्याला इतर भारतीयांसोबत टॉवर सी मध्ये ठेवण्यात आले. त्याठिकाणी प्रकाशला तेलुगु आणि इतर भाषांमध्ये मुलींचे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल बनवायला आणि वापरायला शिकवले गेले.

पहा पोस्ट- 

प्रकाशने पुढे सांगितले की, त्याला आठवडाभर अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले आणि खूप मारले. जेव्हा तो आजारी पडला, तेव्हा त्याला बाहेर काढले. त्यानंतर सायबर फसवणूक करून लोकांकडून पैसे उकळण्यास भाग पाडले. त्याने कसा तरी हा वेदनादायक अनुभव सांगणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो तामिळनाडूमधील त्याच्या बहिणीला ईमेलद्वारे पाठवला. नंतर तिने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: Zerodha Glitch and Loss: झिरोधा डेव्हलपर बगमुळे ₹10 लाखांचे नुकसान; ग्राहकाने मागितले स्पष्टीकरण, कंपनीकडून प्रतिसाद, सोशल मीडियावर चर्चा)

यानंतर, तेथील भारतीय दूतावास आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकार प्रकाशची सुटका करू शकले. प्रकाशने सांगितले की, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील 3,000 भारतीय कंबोडियामध्ये अडकले आहेत. यामध्ये मुलींचाही समावेश आहे ज्यांना भारतामध्ये न्यूड कॉल करून हनी ट्रॅप करण्यास सांगितले जाते.