कोरोना विषाणू (Coronavirus) लस 'कोव्हिशील्ड' (Covishield) च्या दोन डोसमधील अंतर पुन्हा एकदा कमी होऊ शकते. केंद्र सरकार 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार करत आहे. कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा (NK Arora) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, येत्या दोन ते चार आठवड्यांत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. डॉ.अरोरा म्हणाले की, वैज्ञानिक आकडेवारीचा विचार करून हा निर्णय घेतला जाईल. त्यांनी लस आणि त्याच्या दोन डोसमधील अंतराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटावरील प्रभावाचा डेटा गोळा केला आहे.
जानेवारीत लसीकरण मोहिमेच्या सुरुवात झाली तेव्हा, कोव्हिशील्डच्या डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर होते. त्यानंतर ते 6-8 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले आणि नंतर मे महिन्यात ते दुसऱ्यांदा वाढवून 12-16 आठवडे केले. यामुळे लसीची प्रभावीता वाढते असे सांगण्यात आले होते. देशात डोसची तीव्र टंचाई असताना हा निर्णय घेण्यात आला होता. असे म्हटले जात होते की देशात लसीच्या अभावामुळे सरकारने दोन डोसमधील अंतर वाढवले आहे आणि त्यामागे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
आता पुन्हा एकदा सरकार या डोसमधील अंतरामध्ये बदल करून ते कमी करण्याचा विचार करीत आहे. मार्चमध्ये ‘द लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दोन डोस दरम्यान 12 आठवड्यांचे अंतर असल्यास कोव्हिशील्डची कार्यक्षमता 81.3 टक्के आहे. जर दोन डोस दरम्यानचा वेळ सहा आठवड्यांपेक्षा कमी असेल तर प्रभावीपणा 55.1 टक्के खाली येतो. एवढेच नाही तर 12 आठवड्यांनंतर दुसरा डोस घेणाऱ्या सहभागींमध्ये सहा आठवड्यांचे अंतर असणाऱ्या गटापेक्षा दुप्पट प्रतिपिंडे असल्याचे आढळले आहे. (हेही वाचा: परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना Adar Poonawalla करणार मोठी मदत; 10 कोटी रुपयांच्या फंडाची घोषणा)
दरम्यान, कोव्हिशील्डचा एक डोस डेल्टा प्रकाराविरुद्ध फक्त 33 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे आणि या लसीचे दोन डोसच डेल्टा प्रकारापासून संरक्षण देऊ शकतात. आता अनेक देशांनी लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केले आहे आणि भारतावरही तेच करण्याचा दबाव आहे.