Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मालक अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी गुरुवारी सांगितले की, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी 10 कोटी रुपये ठेवले आहेत. काही देशांनी कोव्हिशील्ड लसीला (Covishield Vaccine) क्वारंटाईनशिवाय प्रवेशासाठी मान्यता दिली नाही, त्यामुळे लस घेऊनही अनेक देशांमध्ये प्रवेश केल्यावर आधी क्वारंटाईन व्हावे लागत आहे. अदार पूनावाला यांनी केलेल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की ते 11 युरोपियन युनियन देशांमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देतील. या देशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड लसीला मंजुरी दिली नाही.

पूनावाला यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, ‘प्रिय परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनो, अजूनही काही देशांनी कोव्हिशील्डला क्वारंटाईनशिवाय प्रवासासाठी स्वीकार्य लस म्हणून मंजुरी दिली नाही. त्यामुळे तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील व याचसाठी मी 10 कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे.’ पूनावाला यांनी एक लिंकही शेअर केली जिथे विद्यार्थी गरज पडल्यास आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. अदार यांनी यापूर्वी जुलैमध्ये कोव्हिशिल्डला प्रवेशासाठी स्वीकार्य लस म्हणून मान्यता दिल्याबद्दल 16 युरोपियन देशांचे कौतुक केले होते.

ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन अशा काही देशांनी कोव्हिशील्ड लस घेतलेल्या लोकांना त्यांच्या देशात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सध्या फक्त यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्येच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना क्वारंटाईनच्या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच, जर प्रवाशाने फायझर, मॉडर्ना, एस्ट्राझेनेका किंवा जॉन्सन अँड जॉन्सन यांची कोविड लस घेतली असेल तर त्यांना यूकेच्या प्रवासात क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. (हेही वाचा: LPG Cylinder बुकींगवर Paytm कडून 2,700 रुपयांचे कॅशबॅक; पहा काय आहे ऑफर)

कोव्हिशील्ड जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या यादीत आहे. सध्या, कोव्हिशील्डला 30 देशांनी मान्यता दिली आहे. भारतात बायोटेकची कोवॅक्सिन ही लसही दिली जात आहे. कोवॅक्सिन लसीलाही अद्याप जगात मंजुरी मिळाली नाही.