
काही वर्षांपूर्वी मुलांमध्ये Blue Whale Challenge ची क्रेझ होती. या खतरनाक खेळासारख्याच एका चॅलेंजने आता पुन्हा खळबळ पसरली आहे. गुजरात मध्ये अमरेली जिल्ह्यातील मोटा मुंजियासर गावात एका सरकारी प्राथमिक शाळेतील सुमारे 30-40 विद्यार्थ्यांच्या हातावर कापलेल्या खुणा आढळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, एका वर्गमित्राने पेन्सिल शार्पनर ब्लेडने स्वतःला कापण्यासाठी 10 रुपये बक्षीस देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पालक आणि शाळा अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू झाली आहे.
ETV Bharat च्या वृत्तानुसार, शिक्षक आणि पालकांना अनेक विद्यार्थ्यांच्या हातावर जखमा दिसल्या आणि त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौकशी केल्यानंतर असे दिसून आले की सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हे आव्हान सुरू केले होते. पैशाच्या रूपात बक्षीस मिळवण्यासाठी वर्गमित्रांना स्वतःचे नुकसान करण्यास प्रवृत्त केले होते. गावातील सरपंच आणि संबंधित पालकांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या कृत्यामागील हेतू आणि इतर काही गोष्टींचा समावेश होता का? हे शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तातील माहितीनुसार, विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी फसवले गेले तर काहींना भीती होती की जर त्यांनी नकार दिला तर त्यांना 5 रुपये द्यावे लागतील. शाळेचे मुख्याध्यापक मकवाना यांनी सांगितले की मुले व्हिडिओ गेमची नक्कल करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान अद्याप या घटनेचा ब्लू व्हेल चॅलेंजशी थेट संबंध असल्याचे समोर आलेले नाही. शिक्षण विभागाने चौकशीचा भाग म्हणून सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शक्यतो पालकांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालकांनी त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. अमरेली जिल्हा शिक्षण अधिकारी किशोरभाई मायानी यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे. हे कृत्य ऑनलाइन आव्हानांमुळे प्रेरित आहे की ते पीअर प्रेशर मधून करण्यात आले आहे? याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.