सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या (Coronavirus) समस्येशी झगडत आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ, संशोधक याबाबत लस (Vaccines) बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या विषाणूमुळे अनेक मृत्यू झाले आहेत व लस हाच यावरील एक महत्वाचा उपाय आहे. आशा आहे की कोरोनाची लस बाजारात आल्यावर कोट्यावधी लोक पुन्हा एकदा सामान्य जीवन जगू शकतील. दरम्यान, कोविड-19 ही लस (COVID-19 Vaccines) जूनपर्यंत भारतात येईल, अशी आशा बेंगळुरूस्थित बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ (Kiran Mazumdar-Shaw) यांनी व्यक्त केली आहे. मात्र ही लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे हे एक आव्हान असेल.
बायोकॉनने शुक्रवारी आपल्या सप्टेंबरच्या तिमाहीची मिळकत जाहीर केली, जी मागील तिमाहीत 216 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यातून 169 कोटी रुपयांवर आली आहे. एका खासगी वृत्तपत्राशी झालेल्या संभाषणात त्यांनी लस आणि त्यावरील आव्हानांबाबत आपले मत मांडले. कोविड-19 लस देशात कधी येईल, असे विचारले असता किरण मजुमदार म्हणाल्या, 'मला आशा आहे की हे वर्ष संपायच्या आधी एमआरएनए लस मंजूर होईल. परंतु ती भारतात उपलब्ध होणार नाहीत कारण त्यांना -80० डिग्री कोल्ड चेनची आवश्यकता असते आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण इथे हाताळू शकत नाही.’ (हेही वाचा: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने इमारतीहून उडी मारून केली आत्महत्या; 20 तास पडून राहिला मृतदेह)
त्या पुढे म्हणाल्या, ‘मला आशा आहे की जानेवारीपर्यंत बाहेरील लस- अॅस्ट्रॅजेनेका किंवा आपली स्वतःची भारतीय लस, भारत बायोटेक यासारख्या इतर काही लसांना मान्यता मिळू शकेल. जरी आम्ही पुढील 2-3 महिन्यांत क्लिनिकल चाचणी पूर्ण केली तरीही त्यांना जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत मंजूर केले जाईल. म्हणूनच मला वाटते की कोरोनाची लस 2021-22 पर्यंत भारतात उपलब्ध होईल.'
लस वितरणाबाबत कोणते आव्हान समोर येईल असे विचारले असता, बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणाल्या, ‘एखादे लसीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच झाले नाही. वर्षानुवर्षे पोलिओ लस दिली जात आहे. आशा कार्यकर्त्या किंवा इतर पोलिओ लस देतात, परंतु कोविड लस इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असेल. ते देण्यासाठी नर्स, डॉक्टर आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांची आवश्यकता असेल. मानव संसाधनाव्यतिरिक्त आम्हाला यासाठी कोल्ड चेन पायाभूत सुविधा आवश्यक असतील.’