COVID 19 Vaccine Registration Update: आज दुपारी 4 वाजल्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी CoWIN, Aarogya Setu App, UMANG App सुरू होणार रजिस्ट्रेशन; पहा कशी असेल संपूर्ण प्रक्रिया, काय कराल, काय टाळाल?
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना विरूद्धच्या लढाईत आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा (COVID 19 Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. येत्या 1 मे पासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू होत आहे आणि यामध्ये 18 वर्षां वरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान यापूर्वी प्रथम कोविड योद्धे नंतर वृद्ध आणि सहव्याधी असणारे पुढे 45 वर्षांवरील नागरिक आणि आता 18 वर्षांवरील सारेच या लसीकरणामध्ये जोडले जाणार आहेत. यापूर्वी लसीकरणासाठी असलेल्या नियमांमध्ये आता थोडे बदल करण्यात आले आहेत. देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी या तीन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन उपलब्ध आहे तर 1 मे पासून स्फुटनिक वी देखील खुली करण्याचे प्रयत्न सुरू केले जाणार आहे. मग कोरोना वायरसपासून जीवाचा धोका टाळण्यासाठी या लसीकरणामध्ये सहभागी होताना आता CoWIN, Aarogya Setu App, UMANG App वर नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) गरजेचे आहे. मग पहा हे नेमकं करायचं कसं? कुठे? त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन कसं कराल?

 • कोविन पोर्टल ला भेट द्या. तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर द्या.
 • त्यानंतर तुम्हांला मिळालेला ओटीपी नंबर टाका.
 • तुमचं अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन झालं की तुमच्या सोयीनुसार लसीकरण केंद्र, वेळ निवडा.
 • तुमच्या अपॉईंटमेंट नुसार लसीकरण केंद्रावर पोहचा आणि लस घ्या.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

 • आज आरोग्य सेतूने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 28 एप्रिलला दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. यामध्ये राज्याकडे जसा साठा असेल तशीच अपॉईंटमेंट दिली जाणार आहे.
 • 18  वर्षांवरील नागरिकांना तेव्हाच स्पॉट दिला जाईल जेव्हा राज्य सरकार किंवा खाजगी केंद्रावरून त्याबाबत तयारी असेल.
 • 18 ते 44 वयोगटासाठी इतरांप्रमाणे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनचा पर्याय नसेल त्यामुळे विनाकारण केंद्रांवर जाऊन गर्दी करणं, गोंधळ करणं टाळा.
 • लसीकरणासाठी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे. (नक्की वाचा: Double Masking: कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डबल मास्किंग खरंच फायदेशीर आहे? पहा हे कुणी, कधी, कसं करावं?).

 • महाराष्ट्रात तरूण वर्गासाठी (वय वर्ष 18-44)  लसीकरण मोफतआहे त्यामुळे तुम्हांला शासकीय रूग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. खाजगी, सरकारी केंद्रांवर जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.

लसीकरणाला जाताना कोणती काळजी घ्याल?

 • लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या शरीरात अ‍ॅन्टीबॉडीज वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती या लसीकरणाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
 • लसीकरणापूर्वी आठवडाभर आधी नियमित 6 तास झोप आणि सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. ताण तणावाचं व्यवस्थापन करा. योगा, मेडिटेशन करा.
 • कोरोनाची लक्षणं किंवा कोविड 19 चं निदान झाले असेल तर लसीकरण केंद्रांवर जाणं टाळा तुमची अपॉईंटमेंट रिशेड्युल करा.
 • अनेक केंद्रांवर लसीचा पुरवठा येण्या-जाण्यामध्ये काही वेळ जात आहे त्यामुळे तुमच्या पालिकेकडून जर लसीकरण केंद्रांची यादी नियमित प्रसिद्ध होत असेल तर ती पहा आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेले केंद्र त्यादिवशी उपलब्ध आहे का? हे तपासून मगच लस घेण्यासाठी जा.
 • दरम्यान लसीचा दुसरा डोस दुसर्‍या राज्यात, जिल्ह्यांत, शहरामध्ये घेतला जाऊ शकतो केवळ तो पहिल्या कंपनीचाच असावा.

अद्याप लसीकरणामध्ये कोणती लस घ्यावी हा निवडीचा पर्याय नाही त्यामुळे जी लस उपलब्ध असेल ती घेण्याची तयारी ठेवा. सार्‍या लसींचा उद्देश तुमच्या शरीरात कोरोना वायरस विरूद्ध लढण्यासाठी अ‍ॅन्टिबॉडीज तयार करणं हे आहे. त्यामुळे तुम्हांला जसा सल्ला दिला जाईल तसे दोन्ही डोस घेऊन लसीकरण प्रक्रिया पूर्ण करा. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे पण त्याचा जीवावर होणारा धोका कमी असेल त्यामुळे न घाबरता लस घ्या आणि हे जागतिक संकट परतवुन लावण्यासाठी मदत करा.