Covid-19 Vaccine: भारत ठरू शकतो DNA आधारीत लस तयार करणारा जगातील पहिला देश; ZyCoV-D ची तिसऱ्या टप्यातील चाचणी सुरु 
Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूविरूद्धच्या (Coronavirus) युद्धात लवकरच एक शस्त्र म्हणून आणखी एक लस भारताला मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीची कोविड-19 लस झायकोव्ह-डी (ZyCoV-D) ची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू आहे. ही कोरोना विषाणूविरूद्ध प्लाज्मिड डीएनए लस (DNA-Based Vaccine) आहे. मंडाविया यांनी सभागृहात सांगितले की, जर का लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आणि ती वापरण्यास देशात मान्यता मिळती, तर ही लस कोरोना व्हायरस रोखण्यासाठीची जगातील पहिली डीएनए-बेस्ड लस असेल व भारतामधील चौथी लस असेल.

मंडाविया म्हणाले की, देशातील लसीकरणाची गती अधिक वेगवान करण्यासाठी भारतीय कंपन्या लसीचे उत्पादन वाढवत आहेत. 'देशातील कोरोना साथीचे व्यवस्थापन, लसीकरण आणि धोरणांची अंमलबजावणी आणि तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आव्हाने' या विषयावर राज्यसभेत चर्चेच्या वेळी त्यांनी माहिती दिली की, कॅडिला हेल्थकेयर लिमिटेडच्या डीएनए-बेस्ड लसीची फेज III ची क्लिनिकल ट्रायल चालू आहे.

डीएनए-प्लाझ्मिड आधारित झायकोव्ह-डी लसचे तीन डोस असतील. ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषद अंतर्गत नॅशनल बायोफार्मा मिशनकडून हा लसीला मदत मिळाली आहे. (हेही वाचा: डेल्टा प्लस प्रकार हा अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40-60 टक्के अधिक संसर्गजन्य- INSACOG चे सह-अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा)

तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांच्या डेटाचे विश्लेषण जवळजवळ तयार झाले असून, कंपनीने सरकारला सांगितले आहे की, पुढील आठवड्यात लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी भारतीय औषध नियंत्रक जनरलकडे अर्ज केला जाऊ शकेल. प्रौढ व्यक्तिंसह 12 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांवरही या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांवर कोविड19 लससाठी क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे कंपनीने म्हटले होते.