दिव्यांग (Differently-Abled) आणि अंथरुणाला खिळलेल्या (Bedridden) व्यक्तींचे घरी जावून लसीकरण करण्यात यावे, अशी घोषणा केंद्र सरकारने (Centre Government) आज (गुरुवार, 23 सप्टेंबर) केली. पीटीआय (PTI) ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तसंच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचना जारी केल्या असल्याने आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. (CoWin App वर रजिस्ट्रेशनसाठी दिव्यांगाना UDID फोटो ओळखपत्र लसीकरण केंद्रावर ग्राह्य धरले जाणार)
दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "देश अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आहे. दिवसागणित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या आठवड्यात मिळालेल्या रिपोर्टमधून 62.73 टक्के रुग्ण हे केवळ केरळमध्ये आढळून आले होते. एक लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण असणारे केरळ हे एकमेव राज्य आहे. देशातील सुमारे 33 जिल्ह्यांमध्ये 10 टक्के पॉझिटीव्हीटी रेट तर 23 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटीव्हीटी रेट आहे."
आगामी सणांच्या काळात लोकांची गर्दी होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच 5 टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि कन्टेंट्मेंट झोनमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. देशामध्ये चाललेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत देशातील एकूण 66 टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 23 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. देशात उत्पादन होणाऱ्या एकूण लसींपैकी 63.60 लसींचे डोस हे ग्रामीण विभागाकडे वितरीत केले जातात. तर 35.4 टक्के लसींचे डोस हे शहरी विभागांना पाठवले जातात. तर यापैकी 68.2 लाख डोसेस कोविड लसीकरण सेंटरमध्ये पाठवले जातात.
दरम्यान, 5 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्ह दर असलेल्या ठिकाणी गर्दी करु नये. कोणत्याही कार्यक्रमासाठी पूर्व परवानगी घेतली जावी. तसंच त्यात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्याही सांगितली जावी, असे मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटले आहे. घरीच राहून सण साजरे करावे आणि सणासुदीच्या काळात निष्काळजीपणे वागू नये, असे आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी केले आहे.