Covid 19 New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; भारतामध्ये अलर्ट जारी, केंद्राने जारी केली At Risk देशांची यादी  
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत (Covid 19 New Variant) भारतही सतर्क झाला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना या देशांसह ज्या देशांत कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे, अशा सर्व देशांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी असे निर्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आढळून आल्यानंतर ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, इस्रायल, फ्रान्स आणि इटली या देशांनी दक्षिण आफ्रिकेच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने B.1.1529 या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'चिंतेचा प्रकार' म्हणून घोषित केला आहे. WHO ने आफ्रिकेतील बोत्सवाना येथे प्रथम आढळलेल्या या प्रकाराला ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिले आहे. आता आरोग्य मंत्रालयाने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना कोरोनाचा धोका असलेल्या देशांच्या यादीत स्थान दिले आहे. जर भारताचा जोखीम श्रेणीतील देशांशी एअर बबल करार असेल, तर त्याअंतर्गत उड्डाणे चालतील. जर एअर बबल करार नसेल तर फक्त 50 टक्के उड्डाणे चालतील. केंद्राने म्हटले आहे की, (हेही वाचा: Coronavirus: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून)

जोखीम श्रेणीतील देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना RTPCR चाचणी अहवाल विमानतळावर करण्यात यावी. सध्या सर्व लोकांचा जीनोम सीक्वेन्स केला जात आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये नवीन उत्परिवर्तन झाले आहे की नाही हे कळू शकेल. दिल्ली विमानतळावर दररोज 15000 हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, अद्याप B.1.1.529 प्रकाराचे कोणतेही प्रकरण आढळले नाही.

दरम्यान, गेल्या सुमारे 20 महिन्यांपासून देशात बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 डिसेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित करण्यासाठी ‘आवश्यक पुढील कार्यवाही’ सुरू करण्यास सांगितले आहे. यामध्ये 'नो रिस्क' श्रेणीतील देशांना पूर्ण क्षमतेने फ्लाइट चालवण्याची परवानगी दिली जाईल. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून नियमित उड्डाणे बंद आहेत.