Covaxin Gets WHO Approval: मोठी बातमी! अखेर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मिळाली जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्वदेशी लस Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी, WHO ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना Covaxin लसीचा डोस देण्यास मान्यता दिली आहे. कोवॅक्सिन भारतात विकसित करण्यात आलेली लस असून, ती ICMR आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅड्रेनॉम गेब्रेयसस यांना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी विशेष शिफारस केली होती.

डब्ल्यूएचओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरातील तज्ञांचा समावेश असलेल्या आमच्या टीमने निश्चित केले आहे की कोवॅक्सिन कोरोनापासून संरक्षणासाठी डब्ल्यूएचओच्या मानकांची पूर्तता करते. लसीचे फायदे त्याच्या जोखमीपेक्षा जास्त आहेत. ही लस जगासाठी उपयुक्त ठरू शकते. WHO च्या स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑन इम्युनायझेशन (SAGE) द्वारे Covaxin चे पुनरावलोकन करण्यात आले.

अलीकडेच G-20 बैठकीसाठी इटलीला गेलेल्या पंतप्रधान मोदींनी WHO प्रमुख डॉ. अँटोनियो गुटेरेस यांच्याशी कोवॅक्सिनच्या मंजुरीबाबत चर्चा केली होती. पुढील वर्षाच्या अखेरीस भारत कोरोना लसीचे पाच अब्ज डोस तयार करू शकतो, असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. लस विकसित करणार्‍या हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने 19 एप्रिल रोजी WHO ला इमर्जन्सी यूज लिस्ट (EUL) मध्ये लस समाविष्ट करण्यासाठी EOI सादर केला. तेव्हापासून बैठकांच्या अनेक फेऱ्यांनंतर जागतिक आरोग्य संघटनेला या महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाला कोणत्याही लसीला आपत्कालीन वापराचे परवाने देण्याचे अधिकार आहेत. यापूर्वी सोमवारी ऑस्ट्रेलियन सरकारने कोव्हॅक्सीनला प्रवासासाठी परवानगी दिली आहे. WHO ने आतापर्यंत जगातील सात कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. भारत बायोटेकने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सीडीएससीओने कोवॅक्सिनचा वापर कालावधी उत्पादनाच्या तारखेपासून १२ महिन्यांनी वाढवण्यास मान्यता दिली आहे.' (हेही वाचा: भारत बायोटेकच्या Covaxin लसीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून मान्यता, प्रवाशांना मिळाला दिलासा)

दरम्यान, भारतात सध्या कोरोना लसीकरणासाठी तीन लसी वापरल्या जात आहेत. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची\ स्पुतनिक-व्ही यांचा समावेश आहे.