जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसमुळे प्रदीर्घकाळ शाळा बंद राहिल्याने भारताला 40 अब्ज डॉलर्सचे (जवळजवळ 2932 अब्ज रुपये) नुकसान होऊ शकते. याशिवाय मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होणार ते वेगळेच. अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत दक्षिण आशियाई प्रदेशातील शाळा बंद राहिल्याने, 62 अब्ज 20 कोटी अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होईल. जर का ही परिस्थिती अधिक खराव झाल्यास हे नुकसान 88 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. अहवालात असे म्हटले आहे की, या भागात भारताला अधिक नुकसान सहन करावे लागू शकते. सर्व देश त्यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) महत्त्वपूर्ण भाग गमावतील.
'Beaten or Broken? Informality and COVID-19 in South Asia' नावाच्या या अहवालात असा दावा केला आहे की, कोविड-19 चा अर्थव्यवस्थांवर झालेल्या विनाशकारी परिणामामुळे, 2020 मध्ये दक्षिण आशिया प्रदेशांची आर्थिक स्थिती अजून खराब होईल. दक्षिण आशियाई देशांमध्ये शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. या देशांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 39 कोटी 1 लाख विद्यार्थी शाळांपासून दूर आहेत, ज्यामुळे शिक्षणाच्या संकटाच्या सामना करण्याचे प्रयतन अजून अवघड होतील. (हेही वाचा: कोरोना व्हायरस महामारीमुळे 2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर ओढावेल अत्यंत गरिबीची परिस्थिती- World Bank)
या अहवालानुसार, 'शाळा बंद झाल्याचे परिणाम कमी करण्यासाठी बर्याच देशांनी अनेक पावले उचलली आहेत, परंतु डिजिटल माध्यमातून मुलांना शिकवणे खूप अवघड आहे.' जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे 55 लाख मुले शाळा सोडू शकतात. यामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होईल आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या एका पिढीच्या कार्यक्षमतेवर आजीवन परिणाम होईल. बर्याच देशांमधील शाळा मार्चमध्ये बंद करण्यात आली होती आणि आता काही देशांतच शाळा सुरू करण्यात येत आहेत. मुले जवळपास पाच महिन्यांपासून शाळांपासून दूर आहेत. बर्याच दिवसांपासून शाळांपासून दूर राहण्याचा अर्थ असा आहे की. ते केवळ अभ्यास करणेच सोडणार नाहीत तर त्यांना जे शिकवले आहे तेदेखील ते विसरतील.