A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लोकांचे दुर्लक्ष हे यामागील एक मुख्य कारण आहे. कोरोना विषाणूने भारतामध्ये शिरकाव केल्यापासून सरकार मास्कचे (Mask) महत्व पटवून देत आहे. देशभरातील सुमारे 90 टक्के लोकांना संक्रमणाविरूद्ध मास्कचा वापर किती महत्वाचा आहे हे माहित आहे. परंतु केवळ 44 टक्के लोकच मास्क परिधान करत आहेत व 50 टक्के पेक्षा जास्त लोक मास्क घालत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की. बहुतेक लोक कोरोनाविरूद्ध संरक्षणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत नाहीत, ज्यात 'मास्क घालणे आणि जास्त गर्दीची ठिकाणे टाळणे' यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली, 12 राज्यांचे अधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह कोरोनाचे सर्वाधिक बाधित 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली गेली.

या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहारमधील अधिकारी सहभागी झाले होते. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या 12 राज्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेण्याकरिता, 46 जिल्ह्यांमध्ये किमान 14 दिवस कडक कारवाई करण्याची शिफारस केंद्राने केली आहे. यामुळे संक्रमणाची साखळी तोडण्यात मदत होऊ शकेल. (हेही वाचा: 'दवाई भी-कड़ाई भी' कोरोनाशी लढण्याचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा; 'मन की बात' कार्यक्रमाच्या 75 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहन)

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जर या विषाणूला योग्यप्रकारे रोखले नाही तर संक्रमित व्यक्ती 30 दिवसांच्या कालावधीत 406 अधिक लोकांना संक्रमित करू शकते. जर संक्रमित व्यक्तीचा संपर्क 50 टक्क्यांपर्यंत कमी केला गेला तर, ही आकडेवारी 15 लोकांपर्यंत कमी होईल आणि हा संपर्क 75 टक्के कमी केल्यास रुग्णांच्या संपर्कात आल्यावर संसर्ग होण्याचे प्रमाण सरासरी 2.5 व्यक्ती असे असेल.