Mann ki Baat: 'दवाई भी-कड़ाई भी' कोरोनाशी लढण्याचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा; 'मन की बात' कार्यक्रमाच्या 75 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहन
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. मन की बातच्या 75 व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी लावलेल्या जनता कर्फ्यूचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदाच देशातील लोकांनी जनता कर्फी हा शब्द ऐकला आणि हा शब्द जगासाठी आश्चर्यचकित ठरला. यावेळी मोदींनी कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी 'दवाई भी-कड़ाई भी' या मंत्राचा पुनरुच्चार केला.

मोदींनी आपल्या संबोधनाची सुरुवात जनतेने पाठविलेल्या पत्रांवर चर्चा करुन केली. या पत्रांचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही एवढ्या बारीक नजरेने ऐकले आहे याबद्दल खूप आभारी आहे आणि तुम्ही या कार्यक्रमाशी जोडले गेले आहात. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. आज 75 व्या भागाच्या प्रसंगी मी, मन की बात यशस्वी, समृद्ध करण्यासाठी प्रत्येक श्रोत्याचे आभार मानतो. " (वाचा - Maan Ki Baat जगातील सर्वाधिक मोठी लसीकरण मोहिम सध्या भारतात सुरु आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात या मुद्दयांवर केली चर्चा -

मागील वर्षी मार्च महिन्यात देशातील जनतेने प्रथमचं जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला होता. परंतु, या महान देशाच्या सामर्थ्याचा अनुभव पहा, जनता कर्फ्यू हा शब्द संपूर्ण जगासाठी आश्चर्यचकित करणारा ठरला. हे शिस्तीचे अभूतपूर्व उदाहरण होते. देशातील जनतेने जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पिढ्या-न-पिढ्यांना या एका गोष्टीबद्दल नक्कीचं अभिमान वाटेल.

याशिवाय देशातील जनतेने कोरोना योद्ध्यांचा आदर करण्यासाठी थाळी वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे आदी गोष्टी केल्या. यामुळे कोरोना योद्धाच्या हृदयाला किती स्पर्श झाला हे आपल्याला माहिती नाही. या आदराने भारून गेलेल्या कोरोना योद्ध्याने वर्षभर न थांबता आपले कर्तव्य बजावले.

देशातील मुली आज सर्वत्र आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. ती खेळात आपली आवड दर्शवित आहे. अलीकडेचं मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. यासाठी तिचे खूप खूप अभिनंदन.

गेल्या वर्षी सर्वांना कोरोना लस कधी येईल असा प्रश्न पडला होता. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की, आज भारत जगातील सर्वात मोठे लस अभियान चालवित आहे. मी ट्विटर-फेसबुकवर पाहतो की, लोक लस घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांचे फोटो शेअर करत आहेत.

पंतप्रधान मोदी त्यांच्या मन कि बात कार्यक्रमात म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची गाथा, एखाद्या ठिकाणचा इतिहास, देशाची सांस्कृतिक कथा, तुम्ही 'अमृत महोत्सवा' दरम्यान देशासमोर आणू शकता आणि देशवासियांना जोडण्यासाठी एक माध्यम बनू शकता. 'अमृत महोत्सव' अशा प्रेरणादायक अमृत बिंदूंनी परिपूर्ण असेल आणि त्यानंतर असा अमृत प्रवाह वाहू शकेल, जो आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यानंतर शंभर वर्षांसाठी प्रेरणा देईल.

यापूर्वी गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधील अनेक विषयांवर भाषण केले होते. यात त्यांनी पाण्याचे महत्त्व सांगितले होते. याशिवाय त्यांनी तमिळ भाषेचा उल्लेखही केला होता. तमिळ ही एक सुंदर भाषा आहे, जी जगभरात लोकप्रिय आहे.