Coronavirus: जाणून घ्या का खासगी रुग्णालयांना 600 रुपयांमध्ये विकली जात आहे Covishield लस; Serum Institute of India ने दिले स्पष्टीकरण
Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

देशात कोरोना विषाणू लसीकरणाच्या (Coronavirus Vaccination) तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 मेपासून देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लस दिली जाईल. मात्र सध्या लसीच्या किंमतीबाबत चर्चा सुरू आहे. लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) जाहीर केले आहे की, ते खासगी रुग्णालयांना प्रति लस 600 रुपये दराने विक्री करतील. कंपनीने शनिवारी सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनवलेल्या लसींचा मर्यादित भाग खासगी रुग्णालयांना दिला जाईल. लसीच्या किंमतीबाबत टीकेला सामोरे जाणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सीरमने भारतासाठी जी लसीची किंमत निश्चित केली आहे, ती जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याचे म्हटले जात आहे. यावर कंपनीने म्हटले आहे की, ‘सुरुवातीच्या टप्प्यात आगाऊ निधी मिळाल्यामुळे लसीचे दर जागतिक पातळीवर कमी होते, पण आता उत्पादन वाढविण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. सुरुवातीला लसीचे उत्पादन घेण्यासाठी अनेक देशांनी मदत केली होती. मात्र या लसीची किंमत इतर अनेक वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत अजूनही कमी आहे. कोरोना रोखण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे.’

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, लसीची किंमत भारतासह जागतिक स्तरावरील खरेदीसाठी कमी ठेवली गेली आहे, कारण निर्माण होत असलेल्या लसींची संख्या खूप जास्त आहे. खासगी बाजारामध्ये सध्या अनेक लस जास्त दरात विकल्या जात आहेत. त्या तुलनेत सरकारसाठी ही लस एक तृतीयांश किंमती मध्ये विकली जात आहे. (हेही वाचा: Coronavirus: केंद्र सरकार खरेदी केलेली Corona Vaccines राज्यांना मोफत देणार, लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ)

शेवटी कंपनी म्हणते, ‘सद्य परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. विषाणू सतत बदलत आहे आणि लोकांचा जीव धोक्यात आहे. सध्या अनेक बाबतीत अनिश्चितता असल्याने, आमचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि विस्तारासाठी गुंतवणूक कायम राखणे आवश्यक आहे, जेणेकरून आम्ही आपल्या संपूर्ण क्षमतेने साथीशी लढा देऊ आणि लोकांचे प्राण वाचवू शकू. म्हणूनच खासगी रुग्णालयांना मर्यादित संख्येने कोव्हिशिल्ड लस 600 रुपयांच्या दराने विकली जाईल. लसची ही किंमत कोरोना विषाणूच्या उपचारांच्या खर्चापेक्षा आणि इतर वैद्यकीय खर्चापेक्षा खूपच कमी आहे.