कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी योजलेल्या 'भिलवाडा मॉडेल' (Bhilwara Model) ची देशभर चर्चा होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही त्याचे कौतुक केले आहे. आता तर देशातील विविध भागात भिलवाडा मॉडेल राबविण्याबाबत चर्चा सुरु आहे. भिलवाडा मॉडेलचा परिणाम असा आहे की, शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27 वरच थांबविली गेली आहे. आता सध्या इथले कोरोना विषाणूचे संक्रमण नियंत्रणात आहे. तसेच भिलवाडा येथे 3 ते 13 एप्रिल दरम्यान कर्फ्यू लागू आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण देशात लोकप्रिय ठरलेले ‘भिलवाडा मॉडेल’ नक्की आहे तरी काय? हे मॉडेल कोणी आणि कसे तयार केले? भिलवाडा जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कसे काम केले?
राजस्थानमध्ये मार्चच्या तिसर्या आठवड्यात भिलवाडा जिल्ह्यात कोरोना-पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली होती. तेथे दोन वृद्धांचा मृत्यूसह 27 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने राज्यासह केंद्र सरकार चिंतेत होते. पण सुमारे 20 दिवसांच्या उत्तम व्यवस्थापनानंतर भिलवाडा गुरुवारी पूर्णपणे कोरोना मुक्त झाला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात ज्या मॉडेलची चर्चा होत आहे, त्या भिलवाडा मॉडेलसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एखाद्या निवडणुकीच्या पद्धतीप्रमाणे काम केले. येथे प्रत्येक विभाग वेगवेगळ्या कामांमध्ये विभागलेला आहे. भिलवाडा जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट आणि भिलवाडाचे एडीएम राकेश कुमार हे रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम करत होते. पहिले पाच दिवस तर दिल्ली व जयपूर येथून सतत फोन येत होते. अशात वैद्यकीय विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण पथकाने अथक परिश्रम केले. एडीएम प्रशासन राकेश कुमार यांच्या नेतृत्वात 25 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र हे सोपे नव्हते, वैद्यकीय तपासणीसाठी 2 हजार स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली. 19 मार्चपासूनच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तीन वेळा सर्वेक्षण केले गेले तेव्हा कुठे संशयित रूग्णांची ओळख पटली.
यावेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील नियंत्रण कक्ष हाताळणाऱ्या कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. जिल्ह्यात त्वरीत कलम 144 सह इतरही अनेक आदेश लागू केले गेले. संपूर्ण जिल्हा आयसोलेट केला गेला. अत्यावश्यक सेवा सोडून तर सर्व दुकाने त्वरीत बंद केले गेले. या काळात लोकांना अन्न पुरवण्याची व्यवस्था केली गेली होती.
त्यानंतर कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट निश्चित केले गेले व त्यांना झिरो मोबिलिटी झोन घोषित केले. रुग्णांची ओळख पटल्यावर त्वरीत त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांशीही संपर्क साधून त्यांचेही सर्वेक्षण केले व त्यांनाही आयसोलेट केले गेले. यामुळे कोरोना फैलाव रोखण्यात आला. (हेही वाचा: कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारकडून 15,000 कोटी रुपयांचे आपत्कालीन पॅकेज; अनेक राज्यांना मिळणार आर्थिक मदत)
रेल्वे कर्मचारी NGO च्या मदतीने धान्य देऊन भरतोय हजारो लोकांच पोट : Watch Video
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी डोअर टू डोअर सर्व्हे केला, यातून प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास समोर आला. ज्या लोकांना घरातच वेगळे थाबावण्यात आले आहे त्यांचे वेळोवेळी निरीक्षण केले गेले. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या व बाहेरून आलेल्या प्रत्येकाची नोंदणी व चौकशी झाली. ज्या दवाखान्यात कोरोना बाधित रुग्ण आहे तिथल्या परिसराची वेळोवेळी स्वच्छता केली गेली. अशाप्रकारे अवघ्या काही दिवसांत भिलवाडा येथील कोरोना संक्रमण नियंत्रणात आले. आता तर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीमध्ये भिलवाडा मॉडेल राबवावे असे सांगितले आहे.