कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांची प्रकरणे ज्या देशातून सर्वाधिक समोर येत आहेत, तेथील आरोग्य यंत्रणा जवळजवळ कोसळली आहे. अशात भारत सरकारने आता कोरोनाशी लढण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची योजना आखली आहे. ही योजना पाच वर्षांत पूर्ण होईल.कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी सरकारने गुरुवारी विशेष पॅकेज (Emergency Health Package) जाहीर केले आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी 15000 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी केंद्र सरकार संपूर्ण खर्च करणार आहे.
एएनआय ट्वीट -
Government of India sanctions Rs. 15,000 crores for 'India #COVID19 Emergency Response and Health System Preparedness Package': Union Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/BBmRhGP7zg
— ANI (@ANI) April 9, 2020
या पॅकेजला सरकारने ‘कोरोना व्हायरस इमर्जन्सी रिस्पॉन्स अँड हेल्थ प्रिपेरेनेस पॅकेज’ असे नाव दिले आहे. ते पाच वर्षांत तीन टप्प्यात पूर्ण होईल. सरकारने म्हटले आहे की, पहिला टप्पा जानेवारी 2020 ते जून 2020 या कालावधीत असेल. दुसरा टप्पा जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यंतचा आणि तिसरा टप्पा एप्रिल 2021 ते मार्च 2024 या कालावधीत असेल. केंद्र सरकारचा हा निधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वितरित केला जाईल. सुरुवातीला 7774 कोटी रुपये वापरले जातील. यानंतर 2024 पर्यंत उर्वरित 7226 कोटी रुपये वेळोवेळी खर्च केले जातील. (हेही वाचा: Income Tax Refunds: केंद्र सरकारकडून 14 लाख करदात्यांना भेट; 5 लाखांपर्यंतचा कर परतावा तात्काळ मिळणार)
कोरोना व्हायरससाठी या योजनेतील निधी, रुग्णालये, आयसीयू, ऑक्सिजन पुरवठा आणि वैद्यकीय केंद्रांसाठी वापरला जाईल. या पॅकेजचा हेतू कोरोना विषाणूच्या संक्रमणाला थांबवणे आणि राष्ट्रीय व राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणेला बळकट करणे हा आहे. या व्यतिरिक्त, वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी, प्रयोगशाळेची इमारत आणि जैव-सुरक्षेच्या तयारीसह देखरेखीचे कार्य सुनिश्चित करणे हेही या पॅकेजचे उद्दीष्ट आहे. पॅकेजचे परिपत्रक सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि आरोग्य आयुक्तांना पाठविण्यात आले असून, त्वरित निधी जाहीर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.