छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कांकेर जिल्ह्यातील पंखाजूर पोलिस स्टेशन भागात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे सलग तीन महिन्यांत एका महिलेच्या खात्यातून तीन लाख 22 हजार रुपये काढून घेण्यात आले. महिलेला जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा तिने ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याचे समजून तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हे रुपये पीडित महिलेच्या 12 वर्षाच्या मुलाद्वारे एका ऑनलाईन गेमसाठी (Online Game) उडवले गेल्याचे समोर आले. त्यामुळे जर का जर तुमचे मुल ऑनलाइन गेम खेळत असेल तर काळजी घ्या. कारण आपले दुर्लक्ष व मुलांची गेमिंगची सवय महाग पडू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला शिक्षिका शुभ्रा पालने अचानक तिच्या खात्यातून 3.22 लाख रुपये गायब झाल्याचे पाहून, 11 जून रोजी कांकेर जिल्ह्यातील पंखाजूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजून एफआयआर दाखल करण्यात आला होता. या महिलेने सांगितले की 8 मार्च ते 10 जून या काळात तिच्या खात्यातून 278 व्यवहार झाले. हे व्यवहार आपण केले नसल्याचे तिने सांगितले. तसेच या व्यवहारांचा ओटीपीदेखील मोबाइलवर आला नाही व पैसे कट झाले असेही ती म्हणाली. ओटीपीशिवाय असे पैसे कसे काढता येतील याबाबत पोलिसांना आश्चर्य वाटले. यानंतर ही बाब गांभीर्याने घेत चौकशी सुरू केली.
पोलिसांच्या तपासणीत असे दिसून आले की, महिलेच्या 12 वर्षाच्या मुलाने एक ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आणि या गेमची लेव्हल अपग्रेड करण्यासाठी आईच्या खात्यातून पैसे खर्च केले होते. ही गेम अपग्रेड करण्यासाठी त्याने या खेळामध्ये वापरली जाणारी शस्त्रे 3.22 लाख रुपयांना विकत घेतली. मुलाने चौकशी दरम्यान सांगितले की, तो फ्री-फायर या ऑनलाइन गेमच्या आहारी गेला आहे. शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या आईचा मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक करून व्यवहार करण्यास सुरवात केली. (हेही वाचा: UP: बक्षीस घेण्यासाठी बारबाला स्टेजवरुन खाली न उतरल्याने तिच्यावर झाडली गोळी)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांना मोबाईलवर ऑनलाईन सुविधा देण्यात फायदा व तोटा दोन्ही आहे. परंतु मुलांचे मोबाइल वापरण्याचे प्रमाण कमी करावे. मात्र कोरोनामुळे मुलांचे शिक्षण ऑनलाईन सुरु आहे, अशा परिस्थितीत मुले आता अधिकाधिक मोबाईल वापरत आहेत. परंतु या वेळी पालकांनी आपली मुले मोबाईलवर काय करत आहेत, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.