Chandrayaan 3 (Photo Credit - Twitter)

नुकतेच 14 जुलै रोजी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने इतिहास रचला. देशभरात याचे कौतुक झाले. परंतु या मोहिमेत काम करणारे अनेक कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण पॅड बनवणाऱ्या अभियंत्यांना तब्बल 17 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन किंवा कर्ज काढून हे अभियंते आपले घर चालवत आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

वृत्तसंस्थेने सांगितले की, रांचीमधील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) च्या अभियंत्यांनी इस्रोच्या आदेशानुसार मोबाइल लॉन्चिंग पॅड बनवले आहेत. मात्र त्यांना पगार दिलेला नाही. या कंपनीत सुमारे 2700 कर्मचारी आणि 450 अधिकारी काम करतात. एचईसी हा अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

इस्रोने झारखंडच्या रांची येथील एचईसी कंपनीला मोबाईल लॉन्चिंग पॅडसह अनेक उपकरणे तयार करण्याचे आदेश दिले होते, परंतु या ऑर्डरचे पैसे दिले गेले नाहीत. असे असूनही, कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये इस्रोने दिलेल्या वेळेच्या आधीच ऑर्डर्स पूर्ण केल्या होत्या. फ्रंटलाइनने मे महिन्यातील आपल्या अहवालात सांगितले होते की, एचईसीच्या सुमारे 2,700 कर्मचारी आणि 450 अधिकाऱ्यांना गेल्या 14 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये IANS ने अहवाल दिला होता की, कंपनीच्या अधिकाऱ्यांना वर्षभर आणि कर्मचाऱ्यांना आठ-नऊ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

एचईसीने अवजड उद्योग मंत्रालयाला 1,000 कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची अनेक वेळा विनंती केली आहे. मात्र, केंद्र सरकार मदत करू शकत नाही, असे उत्तर मंत्रालयाने दिले. याशिवाय, एचईसीने गेल्या अडीच वर्षांपासून मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच सीएमडी या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती केलेली नाही. (हेही वाचा: World's Largest Office: आता भारतामध्ये असेल जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत; सुरतच्या डायमंड मार्केटने यूएस पेंटागॉनला टाकले मागे)

एचईसीकडे वर्क ऑर्डरची कमतरता नाही, परंतु खेळत्या भांडवलाच्या कमतरतेमुळे काम वेळेवर पूर्ण होत नाही आणि यामुळे कंपनी सतत तोट्यात जात आहे. कर्ज आणि बोजा इतका आहे की, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास कंपनी पूर्णपणे सक्षम नाही. 1963 मध्ये सुमारे 22 हजार कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या या कंपनीत आता केवळ 3400 कर्मचारी-अधिकारी आहेत.