केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचारांसाठी नवीन योजना (Cashless Treatment Scheme) जाहीर केली आहे. या योजनेत अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास पीडितेच्या उपचाराचा 7 दिवस किंवा कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च भागवला जाईल. हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील. मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. अनेक राज्यांच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी ही माहिती दिली.
गडकरींच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये हा कॅशलेस प्रकल्प पायलट केला होता. यामध्ये योजनेत काही कमतरता आढळल्या. त्यात आता सुधारणा केल्या जात आहेत. सरकार यावर्षी मार्चपर्यंत सुधारित योजना आणणार आहे. गडकरी म्हणाले की, ही योजना कोणत्याही श्रेणीतील रस्त्यावर मोटार वाहनांमुळे होणाऱ्या सर्व अपघातांना लागू असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) ही पोलीस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्था इत्यादींच्या समन्वयाने कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 14 मार्च 2024 रोजी रस्ते अपघातग्रस्तांना 'कॅशलेस' उपचार देण्यासाठी एक पायलट कार्यक्रम सुरू केला होता. चंदीगडमध्ये सुरू करण्यात आलेल्या या पायलट कार्यक्रमाचा उद्देश, रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी वातावरण निर्माण करणे हा होता. या पायलट प्रकल्पाचा नंतर सहा राज्यांमध्ये विस्तार करण्यात आला. आता सरकार पायलटच्या धर्तीवर व्यावसायिक ड्रायव्हर्ससाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी, कामगार कायद्यांचा अभ्यास करत आहे. चालकांच्या थकवामुळे जीवघेणे रस्ते अपघात होत आहेत. ही बाब टाळण्यासाठी ड्रायव्हर्ससाठी कामाचे तास निशिच्त केले जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Kerala Police s24 Ultra Zoom Action: केरळ पोलिसांनी Samsung s24 Ultra फोनचा कॅमेरा वापरून गुन्हेगारांना पकडले; वाहतूक नियमांचे केले होते उल्लंघन, चालान जारी)
गडकरी यांनी सांगितले की, देशात सुमारे 22 लाख चालकांची कमतरता आहे, त्यावर मात करण्यासाठी विशेष प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यात येणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 6 आणि 7 जानेवारी 2025 रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, ज्यामुळे देशातील रस्ते वाहतूक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी समस्या, उपाय आणि पुढील पावले यावर चर्चा करण्यात आली. जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे फायदेही गडकरींनी अधोरेखित केले. ॲल्युमिनियम, तांबे, स्टील आणि प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जात असल्याने स्क्रॅपिंगमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला प्रचंड वाढ होईल, असे ते म्हणाले.